मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात गणिताविषयी अत्यंत मौलिक अशी माहिती दिली. तसेच, काही रंजक बाबीही त्यांनी यावेळी विषद केल्या. त्यांच्या या कथनातून गणिताविषयी वेगळी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहचली आहे. बघा, पंतप्रधान मोदी काय म्हणाले ते
माझ्या प्रिय देशवासियांनो,
तुम्ही पाहिले असेल की काही दिवसांपूर्वी मी आपल्या युवा मित्रांशी, विद्यार्थ्यांशी, ‘परीक्षेवर चर्चा’ केली होती. ह्या चर्चेच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांना परीक्षेत गणिताची भीती वाटते. त्याच प्रमाणे हीच गोष्ट अनेक विद्यार्थ्यांनी मला आपल्या संदेशात देखील पाठवली होती. त्यावेळी मी हे नक्की केले होते की ह्या वेळी मन की बात मध्ये मी ह्या विषयवार निश्चित चर्चा करेन.
मित्रांनो, गणित हा असा विषय आहे जो भारतीय लोकांना सगळ्यात सोपा वाटायला हवा. कारण, संपूर्ण जगभरात गणितातले सर्वात जास्त शोध आणि योगदान भारतीयांनीच तर दिलेले आहे. शून्य म्हणजे झिरोचा शोध आणि त्याचे महत्व ह्या विषयी आपण पुष्कळ ऐकले असेल. अनेकदा आपण असे पण ऐकत असाल की जर शून्याचा शोध लागला नसता तर कदाचित आपण जगात इतकी वैज्ञानिक प्रगती देखील पाहू शकलो नसतो. कॅल्क्युलस पासून कॉम्प्युटर पर्यंत हे सगळे वैज्ञानिक शोध शून्यावरच तर आधारित आहेत. भारतातल्या गणितज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी असे देखील लिहून ठेवले की
यत किंचित वस्तु तत सर्वं, गणितेन बिना नहि!
अर्थात, ह्या संपूर्ण ब्रह्मांडात जे जे काही आहे ते सर्व गणितावर आधारलेले आहे. आपण विज्ञानाचा अभ्यास आठवलात तर ह्याचा अर्थ पण आपल्या लक्षात येईल. विज्ञानाच्या प्रत्येक तत्वात एक गणितीय सूत्रच तर सांगितलेले असते. न्यूटनचे नियम असतील, आईनस्टाईन चे सुप्रसिद्ध समीकरण असेल, ब्रह्मांडाशी जोडलेले सगळे विज्ञान एक गणितच तर आहे. आता तर वैज्ञानिक देखील Theory of Everything विषयी चर्चा करतात, म्हणजेच असे एक सूत्र, ज्या द्वारे ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीला अभिव्यक्त केले जाऊ शकेल. गणिताच्या साहाय्याने वैज्ञानिक जाणिवेच्या इतक्या विस्ताराची कल्पना आमच्या ऋषींनी नेहमीच केलेली आहे.
आम्ही शून्याचा शोध लावला आणि त्याच बरोबर अनंताला म्हणजेच infinite ला देखील व्यक्त केले. सर्वसाधारण चर्चांमध्ये आम्ही जेव्हा संख्यांची आणि आकड्यांची विषयी बोलतो तेव्हा दशलक्ष, अब्ज, ट्रिलियन पर्यंत बोलतो आणि विचार करतो. पण वेदात आणि भारतीय गणितात तर ही गणना खूप पुढेपर्यंत जाते. आमच्या कडे एक श्लोक प्रचलित आहे.
एकं दशं शतं चैव, सहस्रम् अयुतं तथा |
लक्षं च नियुतं चैव, कोटि: अर्बुदम् एव च ||
वृन्दं खर्वो निखर्व: च, शंख: पद्म: च सागर: |
अन्त्यं मध्यं परार्ध: च, दश वृद्ध्या यथा क्रमम् ||
ह्या श्लोकात संख्याचा क्रम सांगितला आहे. जसे की
एक, दहा, शंभर,हजार आणि अयुत !
लाख, नियुत आणि कोटि म्हणजे करोड़ |
ह्याच प्रमाणे ह्या संख्या शंख, पद्म आणि सागर पर्यंत जातात. एक सागर चा अर्थ होतो की 10 ची power 57 | केवळ हेच नाही तर ह्याच्या पुढे देखील आहे, ओघ और महोघ सारख्या संख्या असतात. एक महोघ म्हणजे – 10 ची power 62 च्या बरोबर, म्हणजे एकाच्या पुढे 62 शून्य, sixty two zero |आपण इतक्या मोठ्या संख्येचा नुसता विचार देखील डोक्यात करून पाहिला, तरी कठीण वाटतो. पण भारतीय गणितात ह्याचा उपयोग हजारो वर्षांपासून होत आला आहे. आत्ताच काही दिवसांपूर्वी मला Intel कंपनी चे सीईओ भेटले होते. त्यांनी मला एक painting दिले होते ज्यात वामन अवताराच्या माध्यमातून अशाच एका एका गणनेच्या किंवा मापनाच्या भारतीय पद्धति चे चित्रण केलेले होते. Intel चे नाव आले की Computer आपल्या डोक्यात आपोआप आलाच असेल. Computerच्या भाषेत आपण binary system च्या विषयी देखील ऐकले असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की आमच्या देशात आचार्य पिंगला सारखे ऋषि होऊन गेले, ज्यांनी binary ची कल्पना केली होती. ह्याच प्रमाणे आर्यभट्ट पासून ते रामानुजन सारख्या गणितज्ञांपर्यंत गणिताच्या अनेकानेक सिद्धांतांवर आमच्या इथेच काम झाले आहे.
मित्रानो, आम्हां भारतीयांसाठी गणित कधीच अवघड विषय नव्हता, ह्याचे एक कारण आमचे वैदिक गणित देखील आहे. आधुनिक काळात वैदिक गणिताचे श्रेय जाते – श्री भारती कृष्ण तीर्थ जी महाराजांना | त्यांनी गणनेच्या जुन्या पद्धतींचे पुनरुज्जीवन केले आणि त्याला वैदिक गणित असे नाव दिले. वैदिक गणिताची सर्वात विशेष गोष्ट ही आहे कि त्याच्या द्वारे आपण कठीणातील कठीण आकडेमोड निमिषार्धात मनातल्या मनात करू शकता. आजकाल तर social media वर वैदिक गणित शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्या कितीतरी युवकांच्या videos देखील आपण पाहिल्या असतील.
मित्रांनो, आज ‘मन की बात’ मध्ये वैदिक गणित शिकवणारे असेच एक मित्र आपल्यासोबत जोडले जात आहेत. हे मित्र आहेत कोलकाता चे गौरव टेकरीवाल जी | आणि ते गेल्या दोन अडीच दशकांपासून वैदिक गणिताच्या ह्या चळवळीत अत्यंत समर्पित भावनेने काम करीत आहेत. या, त्यांच्याशीच काही गोष्टी बोलू या.
मोदी जी – गौरव जी नमस्ते !
गौरव – नमस्ते सर !
मोदी जी – मी ऐकले आहे की वैदिक गणिताची आपल्याला खूप आवड आहे, त्या विषयी आपण बरेच काही करत असता. तर आधी मी आपल्याविषयी काही जाणून घेऊ इच्छितो आणि नंतर ह्या विषयाची आवड आपल्याला कशी लागली ते जरा मला सांगाल?
गौरव – सर वीस वर्षांपूर्वी जेव्हा मी Business School साठी अर्ज करत होतो, तेव्हा त्याची स्पर्धा परीक्षा असायची, जिचे नाव होते CAT | त्यात खूप सारे गणिताचे प्रश्न असायचे. जे खूप कमी वेळात करायला लागायचे. तर माझ्या आईने मला एक पुस्तक आणून दिले ज्याचे नाव होते – वैदिक गणित | स्वामी श्री भारतीकृष्णा तीर्थ जी महाराजांनी ते पुस्तक लिहिले होते. आणि त्यात त्यांनी 16 सूत्र दिली होती. ज्यात गणिते खूपच पटकन आणि सोपी होत असत. जेव्हा मी ते वाचले तेव्हा मला खूप प्रेरणा मिळाली आणि गणिताविषयी आवड देखील निर्माण झाली. माझ्या लक्षात आले हा विषय जो भारताची देणगी आहे, आपला वारसा आहे, तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवला जाऊ शकतो. तेव्हा पासून मी हे आपले कार्य/ उद्देश्य ठरवले की गणिताला जगाच्या कान कोपरयात पोचवेन. कारण गणिताची भीती प्रत्येकाला सतावत असतेच. आणि वैदिक गणितापेक्षा जास्त सोपे काय असू शकेल!
मोदी जी – गौरव जी किती वर्षांपासून आपण ह्या विषयी काम करत आहांत ?
गौरव – मला आता जवळ जवळ २० वर्ष झाले सर ! मी त्यातच मग्न झालो आहे.
मोदी जी – आणि जागृतीसाठी साठी काय काय करता? काय प्रयोग करता? कसे जाता लोकांपर्यंत?
गौरव – आम्ही शाळांतून जातो, online शिकवतो. आमच्या संस्थेचे नाव आहे Vedic Maths Forum India | ह्या संस्थेमार्फत आम्ही internet च्या माध्यमातुन 24 तास Vedic Maths शिकवतो सर !
मोदी जी – गौरव जी आपल्याला तर माहितीच आहे, मी सतत मुलांसोबत गप्पा गोष्टी करणे पसंत करतो आणि तशी संधी शोधत असतो. आणि exam warrior ने तर एक प्रकारे मी त्याला संस्थात्मक रूप दिले आहे आणि माझा अनुभव आहे की जेव्हा मी मुलांशी गप्पा मारतो तेव्हा गणिताचे नाव ऐकताच ती पळून जातात. आणि माझा प्रयत्न असाच आहे की विनाकारण हा जो बागुलबुवा निर्माण झाला आहे त्याला पळवून लावावे, ही जी भीती निर्माण झाली आहे ती दूर व्हावी, आणि छोटी छोटी तंत्रे जी परंपरेने चालत आली आहेत, भारताला गणित विषयात काही नवीन नाही आहेत. बहुतेक जुन्या परंपरांमध्ये भारतात गणिताची परंपरा आहे, तर exam warrior ना भीती घालवायची असेल तर आपण काय सांगाल त्यांना?
गौरव – सर हे तर मुलांसाठी सर्वात जास्त उपयोगी आहे. कारण परीक्षेची भीती, बागुलबुवा झाला आहे प्रत्येक घरात. परीक्षेसाठी मुले शिकवणी लावतात, पालक पण त्रस्त होतात. शिक्षक पण त्रासलेले असतात. तर वैदिक गणितामुळे हे सगळे छूमंतर होऊन जाते. साधारण गणितापेक्षा वैदिक गणित १५०० टक्के जलद होते. ह्यामुळे मुलांच्यात आत्मविश्वास येतो आणि मेंदू देखील जलद चालायला लागतो. जसे आम्ही वैदिक गणिताच्या सोबत योगाची पण ओळख करून देतो. ज्यामुळे मुलांना पाहिजे तर वैदिक गणिताद्वारे ते डोळे मिटून देखील गणिते करू शकतात.
मोदी जी – तसे तर ध्यान परंपरा आहे त्यात देखील ह्या प्रकारे गणिते करणे हा ध्यानाचा एक प्राथमिक अभ्यासक्रम देखील असतो.
गौरव – Right Sir !
मोदी जी – चला, गौरव जी, खूप चांगले वाटले मला, आणि आपण हे जे उद्दिष्ट ठेवले आहे आणि विशेष करून आपल्या आई आपल्याला एका गुरूच्या रूपात ह्या मार्गावर घेऊन गेल्या आहेत. आणि आज आपण लाखों मुलांना ह्या मार्गा वरून घेऊन जात आहात. माझ्या कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा!
गौरव – धन्यवाद सर ! मी आपले आभार मानतो सर ! की वैदिक गणिताला आपण महत्व दिले आणि मला निवडले सर! आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत सर!
मोदी जी – खूप खूप धन्यवाद | नमस्कार |
गौरव – नमस्ते सर |
मित्रांनो, गौरवजीनी खूप चांगल्या प्रकारे सांगितले की वैदिक गणित गणिताला कसे अवघडापासून सोपे बनवते. केवळ हेच नाही तर वैदिक गणिताने आपण मोठमोठ्या वैज्ञानिक समस्या पण सोडवू शकता. माझी इच्छा आहे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांना वैदिक गणित जरुर शिकवावे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच, त्यांच्या मेंदूची विश्लेषणात्मक शक्ती देखील वाढेल. आणि हो, गणिताविषयी मुलांच्या मनात जी थोडी फार भीती असते ती देखील नाहीशी होईल.