नाशिक – सातपूर, अंबड आणि सिन्नर औद्योगिक अंबड या परिसरातील भूखंड धारकांनी कायदेशीर तरतूदींना ठेंगा दाखवत नियमबाह्य अतिक्रमित बांधकाम केले असून त्यांच्या कृत्याला एमआयडीसी कडून अभय देण्यात येत असल्याचा आरोप छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियनचे सेक्रेटरी एड. मयूर पांगारकर यांनी केला आहे. सदर कंपन्यांमधील अतिक्रमित बांधकामे त्वरित हटवण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
अधिक माहिती देताना एड. मयूर पांगारकर म्हणाले, अंबड एमआयडीसी परिसरातीलभूखंड क्रमांक एफ -१५,एफ ८६ एम. डी इंडस्ट्रीज व इतर कंपनी भूखंडधारकांनी केलेल्या बेकायदेशीर अतिक्रमित बांधकामांमुळे संबंधित ठिकाणी काम करणार्या कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात सगळी जाण असूनही कंपनी मालक ही बाब रेटून नेत आहेत. कारण अतिक्रमित बांधकामांमध्ये वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याने ते केव्हाही कोसळून कामगारांच्या जीवाला धोका पोहचू शकतो. शिवाय, अशा बांधकामांमूळे कंपनी परिसरात आवश्यक असलेली मोकळी हवा अडवली जात असल्याने कामगारांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. दुर्दैवाने, आगीसारख्या घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी होऊ शकते. काही दिवसांपूर्वी पुण्यानजिक मुळशी येथील पिरांगुट एमआयडीसीमधील वॉटर प्युरिफायर कंपनीत लागलेल्या आगीत १८ कामगारांना जीव गमवावा लागला होता. याची पुनरावृत्ती नाशकात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब एमआयडीसी प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी निवेदनदेखील देण्यात आले. मात्र विविध कारणांची ढाल पुढे करून कंपन्यांमधील अतिक्रमणे हटवण्यास टाळाटाळ करण्यात येत असून एक प्रकारे कंपनी मालकांना अभय देण्यात येत असल्याचा आरोप पांगारकर यांनी केला.
.. तर आंदोलन, कायदेशीर लढ्याचा मार्ग अवलंबणार
या पार्श्वभूमीवर सातपूर, अंबड आणि सिन्नर औद्योगिक परिसरातील अंबड मधील भूखंड क्रमांक एफ -१५,एफ ८६ एम. डी इंडस्ट्रीज व इतर कंपनी कंपन्यांनी अतिक्रमित बांधकामे केली आहेत, ती तत्काळ हटवण्यात यावीत, अशी आमची मागणी असल्याचे पांगारकर यांनी सांगितले. याशिवाय, स्थानिक व्यक्तींना कंपनीनिहाय ८० टक्के जागा राखीव ठेवणे, प्रत्येक कंपनीमध्ये अग्नीरोधक प्रणाली बसवण्यात यावी, कामगारांना सुरक्षाविषयक साहित्याचा पुरवठा करण्यात यावा, कंपन्यांतून सोडण्यात येणार्या सांडपाण्यावर निर्बंध घालण्यात यावे, ज्या हेतूसाठी भूखंड घेण्यात आले त्याचा अयोग्य कारणासाठी वापर होत असल्यास तातडीने कारवाई करण्यात यावी या छावा मराठी माथाडी व जनरल कामगार युनियनच्या मागण्या आहेत. त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मागण्यांची पूर्तता न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन तसेच कायदेशीर मार्गाने लढा तीव्र करण्याचा इशारा पांगारकर यांनी यावेळी दिला.