जम्मू/नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – नववर्षाच्या पूर्वसंध्येला माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे. चेंगराचेंगरीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत. यामध्ये नववर्षानिमित्त मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचल्याचा दावा केला जात आहे. याच दरम्यान, चेंगराचेंगरी झाली. त्यामुळे अनेक भाविक दर्शन न घेताच परतत आहेत. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे.
नवीन वर्षाच्या शुभारंभासाठी अनेक जण धार्मिक स्थळांना भेट देतात. अनेक जण शिर्डीचे श्री साई बाबा, शेगावचे श्री गजानन महाराज किंवा श्री तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी साठी जातात. विशेषत: धार्मिक स्थळाला भेटीचा आणि दर्शनाचा विचार करताना उत्तर भारतातील प्रसिद्ध अशा वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने जातात. वैष्णोदेवी मातेचे मंदिर अत्यंत प्रसिद्ध असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये या संदर्भात देवीच्या मंदिराचे दर्शन आपल्याला घडलेले असते. विशेषत: नवीन वर्षाच्या प्रारंभी भाविक माँ वैष्णो देवीच्या दर्शनाला जातात, कारण वैष्णो देवी हे एक असे तीर्थक्षेत्र आहे, जिथे प्रत्येक भक्ताला जायचे असते.
या दुर्घटनेबाबत ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ. गोपाल दत्त म्हणाले की, माता वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापपर्यंत नेमका आकडा समोर आलेला नाही. तसेच मृतांचे पोस्टमार्टम करायचे आहे. याशिवाय जखमींना उपचारासाठी श्री वैष्णोदेवी नारायणा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आतापर्यंत १४ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील पोलिसांनी सांगितले की, ही घटना पहाटे २.४५ वाजता घडली. सध्या सुरुवातीच्या अहवालात आम्हाला कळले आहे की, काही जणांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर हाणामारी झाली. यानंतर अनेक भाविक पळू लागले, त्यामुळे हा अपघात झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैष्णो देवी मंदिरातील दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला, तर गृहमंत्री अमित शाहा यांनी जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या दुर्घटनेची माहिती घेतली. वैष्णो देवी मंदिर परिसराचे व्यवस्थापन अधिकारी जगदेव सिंह यांनी सांगितले की, मृतांपैकी एक जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील रहिवासी आहे. याशिवाय अन्य ११ जण देशातील विविध राज्यातील आहेत. मृतांमध्ये आतापर्यंत ७ जणांची ओळख पटली आहे. अन्य ५ जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच सध्या अर्धकुवारी, बाणगंगा येथून होणारी यात्रा बंद करण्यात आली आहे.
https://twitter.com/narendramodi/status/1477090989151973376?s=20
सिंह पुढे म्हणाले की, नववर्षाच्या पूर्वसंध्येला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सुमारे ८० हजार भाविक पूजेसाठी मंदिरात पोहोचले होते. एका स्थानिक दुकानदाराने सांगितले की, स्थानिक बोर्डाने भाविकांची संख्या निश्चित केलेली नाही. त्रिकुटा टेकडीवर सुमारे ५ ते १० हजारपेक्षा जास्त भाविक राहू शकत नाहीत. अशा परिस्थितीत पोलीस आणि मंदिर प्रशासनाने कटरा बेस कॅम्पवर थांबून आपली मर्यादा निश्चित करायला हवी होती.
जखमींपैकी अनेकांची प्रकृतीही चिंताजनक आहे. सध्या १४ जखमींना श्री माता वैष्णोदेवी नारायणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रियासीच्या पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले की, बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून वैष्णोदेवी बोर्डाचे प्रतिनिधी आणि अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.