मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारताने दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून नष्ट केले. भारतीय सैन्यदलांचे आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भारताने केलेल्या या हल्ल्यात देशाचा मोठा शत्रू असलेल्या मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मसूद अझहरचा भाऊ रौफ असगर हा गंभीर जखमी झाला आहे. तर ठार झालेल्यांमध्ये मसूद अझहरचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॅान्टेड दहशतवादी रौफ असगरचा मुलगा हजैफा यांचा देखील समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे.
मसूद अझहरने आजवर भारताविरुध्द अनेक वेळा कट रचले आहेत. मौलाना मसूद अझहर हा जैश – ए- मोहम्मद दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. २००१ मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता. यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर हाच सूत्रधार होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्याने भूमिका बजावली होती.