मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शतकांचे मजले चढवून विश्वविक्रमांचा डोंगर उभा करणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला त्याच्या वांद्रे येथील बंगल्यांचे मजले वाढविण्याची परवानगीही देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच त्याचा बंगला पाच मजल्यांचा झालेला दिसणार आहे.
सचिन तेंडुलकरचा वांद्रे पश्चिम येथील पेरी क्रॉस रोडवरील बंगला सागरी नियमन क्षेत्रात येतो (सीआरझेड २). त्यामुळे त्याठिकाणी एफएसआयचे वेगळे नियम आहेत. अश्या परिस्थितीत ज्यावेळी बंगल्याचे बांधकाम सुरू झाले त्यावेळी याठिकाणचा एफएसआय १ होता, त्यामुळे साडेतीन मजल्यांची इमारत उभी होऊ शकली होती. मात्र आता नवीन नियमांनुसार ०.५ ने एफएसआय वाढला आहे. त्यामुळे आणखी दीड मजले चढविणे त्याला शक्य होणार आहे.
पूर्वी या बंगल्याच्या जागी दोराब व्हिला नावाचा बंगला होता. या बंगल्याचे क्षेत्र सहा हजार चौरस फुट एवढे असून पूर्वीच्या बांधकामाची परवानगी त्याला २००७ मध्येच मिळाली होती. पण नवीन नियम आल्यानंतर स्वतः सचिन व त्याची पत्नी डॉ. अंजली यांनी सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण तसेच मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांना नवीन नियमानुसार परवानगी बहाल करण्यात आली. अभिनेत्री जया बच्चन यांच्या विलेपार्ले येथील कपोई हाऊसिंग सोसायतील बंगल्याला तसेच प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचे व्याही सिरील श्रॉफ यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामालाही मंजुरी देण्यात आली आहे.
मलबा टाकता येणार नाही
पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दराडे यांनी नियमांचे पालन करण्याच्या अटीवरच गेल्या महिन्यात बांधकामाला मंजुरी दिल्याचे सांगितले. २०१९ च्या सीआरझेड अधिसूचनेतील नियम, अटी व शर्थींच्या अधीन राहूनच सचिनला बांधकाम करावे लागणार आहे. वाढीव बांधकाम करताना तयार होणारा मलबा त्यांना सागरी नियमन क्षेत्रात टाकता येणार नाही, असे नियमांत स्पष्ट नमूद आहे.
Master Blaster Sachin Tendulkar Dream Home