नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मानवतेची खरी सेवा म्हणजे “रक्तदान” असे मानले जाते. रक्तदान करून अनेकांना नवजीवन देता येते, समाजात आपले योगदान देता येते. अशा या श्रेष्ठ कार्यासाठी ब्रह्माकुमारी संस्थेच्या वतीने दरवर्षी विशेष उपक्रम राबवले जातात.
यावर्षी राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या १८व्या पुण्यस्मरणा निमित्त ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे २२ ते २५ ऑगस्ट या कालावधीत “एक थेंब अनंत आशीर्वाद” या घोषवाक्यासह देशव्यापी रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ६००० सेवा केंद्रांवर होणाऱ्या या शिबिरांतून एक लाख युनिट रक्त संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे २३ ऑगस्ट हा दिवस “विश्वबंधुत्व दिवस” म्हणून घोषित करण्यात आला आहे. या अनोख्या अभियानाचा एक भाग म्हणून नाशिकमध्ये तीन दिवस सलग रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. जगातील विविध सेवा केंद्रांतर्फेही मोठ्या स्वरूपात रक्तदान शिबिरांचे आयोजन त्या-त्या सेवा केंद्रांमध्ये करण्यात आले आहे.
२३ ऑगस्टला इंदिरानगर येथे प्रारंभ
या अभियानाचा शुभारंभ शनिवारी, दि. २३ ऑगस्ट रोजी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे होत आहे. सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत हे रक्तदान शिबिर होईल. या शिबिराचे आयोजन ब्रह्माकुमारीज़ एवं समाज सेवा प्रभाग (RERF) यांच्या वतीने करण्यात आले असून, मुंबई नाका सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी विणा दीदी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
ठिकाण: ब्रह्माकुमारी शिवदर्शन भवन, दिपाली नगर, श्रीकृष्ण हॉटेलच्या मागे, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक.
मेरी सेवा केंद्रात २४ ऑगस्टला शिबिर
या अभियानाचा दुसरा टप्पा २४ ऑगस्ट रोजी मेरी सेवा केंद्रात होणार आहे. या शिबिराचे मार्गदर्शन ब्रह्माकुमारी वासंती दीदी करतील. नाशिक उपक्षेत्रीय मुख्य संचालिका म्हणून दीदीजींनी सतत समाजहिताचे उपक्रम राबवले असून, यंदा अधिकाधिक रक्तदात्यांनी पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले आहे.
ठिकाण: प्रभू प्रसाद, आकाश पेट्रोल पंपच्या मागे, दिंडोरी रोड, म्हसरूळ.
नाशिक रोड केंद्रात २५ ऑगस्टला शिबिर
यानंतर २५ ऑगस्ट रोजी नाशिक रोड सेवा केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथे या उपक्रमाचे मार्गदर्शन ब्रह्माकुमारी शक्ती दीदी करणार आहेत. सलग तीन दिवस, विविध सेवा केंद्रांतून रक्तदान शिबिरे होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
ठिकाण: स्टेट बँकेच्या वर, सेंट फिलॉमिना स्कूलच्या समोर, नाशिक रोड, जेल रोड.
जागतिक विक्रमाची नोंद होणार
या अभियानाद्वारे केवळ नाशिकच नव्हे तर देशभरातील ब्रह्माकुमारी संस्थांच्या शाखांमध्ये रक्तदान शिबिरे घेतली जात आहेत. या शिबिरांतून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याचा मानस संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला आहे. जगभरातून लाखो रक्तदाते या अभियानाचा भाग बनणार आहेत.
वासंती दीदींचे आवाहन या उपक्रमाच्या निमित्ताने नाशिक उपक्षेत्रीय मुख्य संचालिका राजयोगिनी ब्र.कु. वासंती दीदीजी यांनी नागरिकांना आवाहन केले की, “रक्तदान म्हणजे जीवनदान. प्रत्येक थेंब रक्त एखाद्या गरजूला नवजीवन देतो. या पुण्यकार्यात सहभागी होणे म्हणजेच आपल्या भाग्याचे भागीदार होणे आहे. त्यामुळे नाशिककरांनी मोठ्या संख्येने पुढे येऊन या अभियानाचा भाग व्हावे.”
प्रतिष्ठित संस्थांचे सहकार्य
या रक्तदान अभियानाला रेडक्रॉस सोसायटी, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स यांचे सहकार्य लाभले आहे. अधिकृत प्रयत्नांतून या अभियानाची नोंद जागतिक स्तरावर होणार आहे.
नागरिकांमध्ये उत्साह
नाशिक मध्ये होणाऱ्या या अभियानासाठी स्वयंसेवक, सेवाभावी संस्था, महाविद्यालयीन युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.