इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोना प्रादुर्भावामुळे मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, एखादी व्यक्ती एकट्याने वाहन चालवित असेल तर तिलाही मास्क बंधनकारक आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. एकट्याने वाहन चालवताना मास्क घालणे अनिवार्य करण्याचा दिल्ली सरकारचा आदेश निरर्थक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हा निर्णय अद्याप अस्तित्वात का आहे, असा जाबही विचारला आहे. न्यायालय म्हणाले की, “दिल्ली सरकारने नागरिकांना दिलेला हा आदेश परत का घेतला नाही? हा निर्णय अतिशय निरर्थक असून, आपल्याच गाडीत बसून, एकटे असताना मास्क लावण्याची सक्ती करण्याचे कारण काय?”
न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती जसमीत सिंग यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारच्या वकिलांना विचारले, “हा आदेश अद्याप अस्तित्वात का आहे?” दिल्ली सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने एक घटना सांगत निरीक्षण नोंदवले होते. त्या घटनेमध्ये एक व्यक्ती आईसोबत कारमध्ये बसला होता. गाडीची खिडकी बंद करून तो कॉफी पीत होता. त्या व्यक्तीने मास्क लावला नाही म्हणून त्याच्याकडून दंड आकारण्यात आला. अशी प्रकरणे सातत्याने घडत असल्याने दिल्ली सरकारला त्यांच्या नियमांबाबत हा जाब विचारण्यात आला आहे.
सुनावणीदरम्यान, दिल्ली सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील राहुल मेहरा म्हणाले की, ७ एप्रिल २०२१ च्या उच्च न्यायालयाचा निर्णयानुसार, गाडी चालवताना मास्क न घातल्याबद्दल दंड घेण्याच्या दिल्ली सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणे अत्यंत दुर्दैवी आहे. ते म्हणाले, “कोणीतरी गाडीच्या खिडकीच्या काचा लावून गाडीच्या आत बसले आहे आणि त्याचे २ हजार रुपयांचे चलन कापले जाणे हे निश्चितच दुर्दैवी आहे. पण जेव्हा दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यासंबंधीचे निर्णय आखले होते तेव्हा कोरोनाची परिस्थिती गंभीर होती. आता महामारी जवळजवळ संपली आहे. खंडपीठाने यावर, “तो आदेश चुकीचा होता, मग तुम्ही तो परत का घेत नाही”, असा प्रश्न केला. या आवाहनामुळे दिल्ली सरकार आता गाडीत मास्क लावण्याचा निर्बंध उठवण्याची शक्यता आहे.