मॉस्को (रशिया) – जगभरात बहुतांश देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात अद्याप आहे. त्यातच आता नवनवीन विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहाजिकच याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावी, म्हणून सर्व देशातील सरकारकडून तसेच प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते की, ‘मास्कचा वापर करा ! ‘पण मास्क घाला, असे कुणाला सांगणे सुध्दा जीवावर बेतू शकते? वास्तविक, मास्क घालणे सुरक्षित अंतर राखणे वारंवार हात धुणे यासारख्या नियमावलीचे पालन करणे आवश्यक असते त्यामुळे असे कुणाला सांगितले तर त्या माणसाने रागाच्या भरात गोळ्या झाडल्या तर काय होईल ? अहो जीवच जाईल ना, रशियात असे घडले आहे.
मास्क घालण्यास सांगितल्याच्या कारणावरून मॉस्कोमधील सरकारी सेवा केंद्रात एका संतप्त व्यक्तीने दोघांना गोळ्या घालून ठार केले. तसेच या घटनेत आणखी चार जण जखमी झाले आहेत. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, सुरक्षा रक्षकाने एका नागरिकाला मास्क घालण्यास सांगितल्यावर झालेल्या वादानंतर या हल्लेखोराने बंदूक बाहेर काढली आणि गोळीबार केला.
याप्रकरणी संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या गोळीबारात चार जण जखमी झाले असून, त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. या जखमींमध्ये १० वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे, जखमींवर डॉक्टर उपचार करत असून रशियाच्या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे. गोळीबार साइटवर एक ग्लॉक हँड गन (बंदूक) सापडली आहे. हँडगन आणि इतर शस्त्रांची वैयक्तिक मालकीला रशियामध्ये बंदी आहे. केवळ व्यावसायिक क्रीडा नेमबाजांना याची परवानगी आहे आणि ही शस्त्रे शूटिंग क्लबमध्येच ठेवणे आवश्यक आहे. आता हे गन कुठून आले याचा रशियाच्या तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.