नवी दिल्ली – अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी मास्क घालण्याची अनिवार्यता हटविणे अनेक देशांना महागात पडले आहे. खूपच वेगाने पसरणार्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटने इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांची दारे ठोठावली आहेत. डेल्टा व्हेरिएंट या देशांमध्ये आता वेगाने पसरत आहे. त्यामुळे तिन्ही देशांमध्ये आता विनाकारण घराबाहेर फिरण्यावर निर्बंध लावण्यासह कोविड नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
१) इस्रायल – जगभरातील देशांपैकी एक लसीकरणाचे सर्वात यशस्वी अभियान चालवून कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविणार्या इस्रायलने १८ जूनला बंद ठिकाणांवर मास्क घालण्याची अनिवार्यता संपविली होती. त्यानंतर तिथे दररोज सापडणार्या रुग्णांची संख्या पुन्हा शंभराच्या वर जाऊ लागली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे नव्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे टास्कफोर्सने म्हटले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर इस्रायलच्या आरोग्य विभागाने आता मास्क घालणे अनिवार्य केले आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या
२२ जून – १२३
२३ जून – १४६
२४ जून – २०५
२५ जून – २०८
२६ जून – १८५
लसीकरणाची स्थिती
– लोकसंख्या – ९० लाख अंदाजे
– लशीचे डोस- १.०७ कोटींहून अधिक
– पूर्ण लसीकरण करणारी लोकसंख्या – ५७ टक्के
२) ऑस्ट्रेलिया – कोविड लसीकरण २२ फेब्रुवारीला सुरू झाल्यानंतर दररोज आढळणार्या रुग्णांची संख्या सरासरी दहावर मर्यादित झाली होती. परिणामी व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्समध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे नियम शिथिल केले होते. बंद ठिकाणांवरच मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले होते. परंतु डेल्टा व्हेरिएंटमुळे ऑस्ट्रेलियासमोर पुन्हा आव्हाने निर्माण झाली आहेत. डेल्टाने संक्रमित रुग्णांची संख्या ६० च्या वर गेल्याने सिडनीसारख्या शहरांमध्ये किमान एक आठवडा तरी घरातून बाहेर पडू नये असे आदेश देण्यात आले आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या
२२ जून – १०
२३ जून – १२
२४ जून – ३०
२५ जून – १४
२६ जून – ३४
लसीकरणाची स्थिती
– लोकसंख्या २.५४ कोटी
– ७२.६ लाखांच्या जवळ लसीकरण
– पूर्ण लसीकरण केलेली लोकसंख्या – ४.७ टक्के
३) फिजी – एप्रिलमध्ये फिजीमध्ये वर्षभर सलग कोरोनाच्या सामुदायिक प्रसाराचे एकही प्रकरण समोर आले नव्हते. हा एक विक्रमच होता. परंतु डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट आल्याने या बेटांच्या शहरात पुन्हा एकदा कोरोना आपले हातपाय पसरत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारे, शारिरीक अंतर न पाळणारे तसेच रात्रीची संचारबंदी न पाळणार्यांविरुद्ध दंड वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित ठिकाणावरच दंड वसूल करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.
अशी वाढली रुग्णसंख्या
२२ जून – १८०
२३ जून – २७०
२४ जून – ३०८
२५ जून – २१५
२६ जून – २६६
लसीकरणाची स्थिती
– लोकसंख्या – ८.९ कोटी
– २.७४ लाखांहून अधिक लसीकरण
– पूर्ण लसीकरण केलेली लोकसंख्या – २ टक्के
जर्मनीसुद्धा मास्कमुक्त होण्याच्या तयारीत
जर्मनीचे आरोग्य मंत्री जेंस स्पाह्न यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे नियम शिथिल करण्याचे संकेत दिले होते. ऑसबर्गर एलेगमिन संस्थेच्या एका सर्वेक्षणानुसार, डेल्टासह इतर घातक अवतारांच्या पार्श्वभूमीवर ४४.७ टक्के जर्मन लोकांनी संपूर्ण आयुष्यात मास्क लावण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. तर मास्क लावल्याने त्रस्त झालेल्या ४१.९ टक्के लोकांनी महामारी संपताच तो काढून टाकणार असल्याचे म्हटले आहे. मास्कबद्दल (४८.२ टक्के) महिला आणि (४१.२ टक्के) पुरुष सकारात्मक होते.
कोरोनाचा प्रकोप
२२ जून – ६८८
२३ जून – १११४
२४ जून – ४४४
२५ जून – ७९७
२६ जून – ४९४
लसीकरणाची स्थिती
– लोकसंख्या – ८.३ कोटी
– ७.१४ कोटी लोकांचे लसीकरण
– पूर्ण लसीकरण करणारी लोकसंख्या- ३४.८ टक्के