इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
जगभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग कमी जास्त होत असून कोरोनाच्या लाटा एक मागुनी येत आहेत, त्यामुळे अद्यापही काही देशांमध्ये या संदर्भात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विशेषतः कोरोना नियमावलीचे पालन करणे प्रत्येकालाच बंधनकारक ठरते. विशेषतः मास्क लावणे, वारंवार हात धुणे आदी नियम पाळणे गरजेचे ठरते. परंतु सार्वजनिक ठिकाणी अशा नियमांचे पालन केले नाही तर त्याचा फटका सर्वांनाच बसू शकतो, मग विमान प्रवासात देखील असे घडू शकते याचा प्रत्यय नुकताच आला.
अमेरिकेतील मियामी येथून लंडनला जाणारे फ्लाइट एका ४० वर्षीय महिलेने मास्क न घालण्याच्या आग्रहामुळे मध्यमार्गे परतले. विमानात १२९ प्रवासी आणि १४ क्रू मेंबर्स होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर महिला प्रवाशाने मास्क घालण्यास नकार दिला. त्यामुळे पायलटने ९० मिनिटांच्या उड्डाणानंतर विमान मियामीला परत आणले. विमान प्रवासादरम्यान नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी विमानतळ प्रशासनाने तपास पूर्ण होईपर्यंत महिलेच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. विमानातील इतर प्रवाशांना नंतर दुसऱ्या विमानाने त्यांच्या इच्छीत स्थानी पाठवण्यात आले.
सदर महिलेने मास्क न घातल्यानंतर मियामीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी विमानतळावर धाव घेतली आणि विमान परत येत असल्याची माहिती दिली. पोलिस विभागाने सांगितले की, महिलेने मास्क न लावल्याने विमान परत आल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी महिलेला अटक करण्यात आलेली नाही. विमानतळ प्रशासन आपल्या स्तरावर हे प्रकरण हाताळत आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने निर्देश दिले आहेत की ट्रेन, विमान आणि बसमधून प्रवास करताना प्रवाशांनी फेस मास्क घालणे आवश्यक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी हा निर्देश गेल्या डिसेंबर महिन्यापासून येत्या १८ मार्चपर्यंत वाढवला होता.
मास्क न लावणाऱ्या आणि प्रवासादरम्यान निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आहेत. तसेच विमानात मनमानी करण्याचे प्रकार वाढले आहेत, त्यामुळे FAA ने यावर्षी हवाई प्रवासा दरम्यान असे प्रकार केल्याच्या एकूण १५१ प्रकरणांची नोंद केली आहे. यापैकी सर्वाधिक ९२ प्रकरणे फेस मास्कशी संबंधित आहेत. दरम्यान, शिकागोहून आइसलँडला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये एका महिलेने पाच तास स्वत:ला टॉयलेटमध्ये कोंडून घेतले होते. प्रवासा दरम्यान महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समजले. विमानात १५० प्रवासी होते. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची भीती त्या महिलेला होती