नवी दिल्ली – कोरोनाने सर्वांचे जीवन पूर्णपणे बदलले आहे. कोरोना काळात मास्क वापरण्यासह शारिरीक अंतर राखण्याचा नियम सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग झाला आहे. कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस घेऊन लोक सुरक्षित राहात असले तरी अजून किती दिवस मास्क घालावा लागेल हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. पुढील वर्षापर्यंत मास्क घालावाच लागेल असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले आहे.
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. डॉ. पॉल म्हणाले, कोरोनाला पराभूत करण्यासाठी लस, औषध आणि कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे. कोरोनाला मात द्यायाची असेल तर या सर्व गोष्टींचे पालन करावे लागेल. त्यामुळे पुढील वर्षीसुद्धा देशातील जनतेला मास्त घालावा लागणार आहे. अद्याप तिसर्या लाटेची शक्यता टळलेली नाही. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात धोका कायम राहील. मास्क घालण्यातून सध्या सुटका होणार नाही. थोडेथोडके दिवस नव्हे, तर पुढील वर्षापर्यंत मास्क घालणे सुरूच ठेवावे लागणार आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येणार? या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी दिले. पॉल म्हणाले, की कोरोना तिसर्या लाटेच्या शक्यतेला नाकारता येणार नाही. येत्या चार-पाच महिन्यात लशीच्या माध्यमातून समुह प्रतिकारकशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होऊ शकते. महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला स्वतःला तयार राहावे लागणार आहे. आपण सर्वांनी एकत्रितरित्या सामना केला तर हे शक्य असेल. दिवाळी आणि दसरासारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर या काळात कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले नाही तर कोरोना विषाणूचा वेगाने प्रादुर्भाव होऊ शकतो, असा इशाराही डॉ. पॉल यांनी दिला आहे.