नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मशिदींवरील भोंग्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक पदाधिकाऱ्यांनी नाशिक पोलिस आयुक्तांना आज निवेदन दिले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, हे भोंगे उतरविण्यात यावेत. जर हे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.
मनसेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयास जगण्याचे, आपल्या धर्माचे पालन करण्याचे समान अधिकार दिले असून संविधानाच्या कलम २५ ते २८ मध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याचा, तसेच त्याप्रमाणे आचार, प्रचार, उपासना करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र तसे करतांना इतर नागरिकांच्या मुलभूत अधिकारांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेण्याचे घटनेत अभिप्रेत आहे. भोंग्यांमधून अजानच्या घोषणा देणे हा इस्लामचा भाग नसून अनेक मुस्लीम देशांत यावर कडक निर्बंध आहेत. १९७० च्या दशका पर्यंत मशिदींवरील भोंग्यांमधून अजानच्या घोषणा देण्यात येत नव्हत्या. मशिदींवरील भोंग्यांमधून उच्चस्वरातील घोषणांमुळे सार्वजनिक शांततेत भंग होत असल्याबाबत विविध न्यायालयांत दाखल जनहित याचिकांवर वेळोवेळी मा. खंडपीठांनी भोंग्यांविरोधात निकाल दिले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १८ जुलै २००५ च्या जनहित याचिकेवरील निकालात (Appeal (civil) 3735 of 2005) प्रत्येक भारतीयास घटनेने कलम २१ अन्वये दिलेल्या जगण्याच्या अधिकारात ध्वनी प्रदूषणामुळे व्यत्यय येत असून मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळे काढण्याच्या आदेशाचे प्रशासनाने सक्तीने केलेल्या पालनाबाबत सर्व धर्मियांनी सकारात्मक भुमिका घेतली होती. मात्र मशिदींवरील भोंगे काढण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे तंतोतंत पालन होणे अपेक्षित असतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर सीआरपीसी कलम १४९ अन्वये बजावण्यात आलेल्या नोटीसा ह्या संविधानाने दिलेल्या जगण्याच्या अधिकाराचे व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मशिदींवरील भोंगे विरोधातील निकालाचे उल्लंघन आहे. बॅनर, हेल्मेट सक्ती सारख्या विषयांवर प्रशासनाने जनहितार्थ सक्तीने निर्णय घेतले आहेत तसेच मशिदींवरील भोंगे उतरविण्याच्या मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे सक्तीने पालन व्हावे. मशिदींवरील भोंगे तात्काळ (आठ दिवसांच्या आत) न उतरविल्यास मनसे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे मा. पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी मा. पोलीस आयुक्तांनी सदर विषयावर राज्य सरकारकडून निर्देश मिळणे अपेक्षित असून त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, संदीप किर्वे, सत्यम खंडाळे, नितीन माळी, संदीप भवर, कामिनीताई दोंदे, पद्मिनीताई वारे, शैलाताई शिरसाठ आदि पदाधिकारी उपस्थित होते.