मुंबई – देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून नावलौकिक असलेल्या मारुती सुझुकीला सप्टेंबरमध्ये मोठा झटका बसला आहे. कारण कंपनीच्या विक्रीत 46.16 टक्के मोठी घट झाली आहे. इलेक्ट्रॉनिक कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे मागील महिन्यात कंपनीच्या विक्रीवर विपरित परिणाम झाला आहे. हा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी कंपनी सर्व शक्य उपाययोजना करत आहे, असे कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
मारुती सुझुकीचे अधिकारी म्हणाले की, सप्टेंबर 2021 मध्ये मारुती सुझुकीने एकूण 86,380 वाहनांची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कंपनीने 1,60,442 वाहनांची विक्री केली. म्हणजेच या वर्षी सप्टेंबरमध्ये 74,062 पेक्षा कमी वाहनांची विक्री केली आहे. तसेच देशांतर्गत 54.9 टक्क्यांनी घटून 68,815 युनिटवर आली. इलेक्ट्रॉनिक घटकांच्या अभावामुळे विक्रीत घट झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
या वाहनांच्या विक्रीत घट
अल्टो आणि एस-प्रेसो सारख्या मिनी वाहनांची विक्री गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 27,246 वाहनांच्या तुलनेत 45.18 टक्क्यांनी घसरून 14,936 वाहनांवर आली. त्याचप्रमाणे कॉम्पॅक्ट सेगमेंटच्या विक्रीत सर्वात मोठी घट दिसून आली आहे. मारुती स्विफ्ट, सेलेरियो, इग्निस, बलेनो आणि डिझायर या विभागाने सप्टेंबरमध्ये 84,213 युनिट्सची विक्री नोंदवली आहे, सप्टेंबर 2020 च्या तुलनेत 75.19 टक्क्यांनी म्हणजे 20,891 वाहनांची घट झाली आहे.