इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुमच्याकडे मारुती सुझुकी कंपनीची कार असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने जाहीर केले की त्यांनी वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निस या मॉडेलच्या तब्बल ९ हजार ९२५ कार परत मागवल्या आहेत. या सर्व कार ३ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२२ दरम्यान तयार करण्यात आलेल्या आहेत. याच कार आता कंपनीने परत मागवल्या आहेत.
कंपनीने सांगितले की, या कारच्या मागील ब्रेक असेंबली पिनमध्ये दोष आढळून आला आहे. मारुती सुझुकीने सांगितले की, ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून वाहन परत मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारचे सदोष भाग मोफत बदलले जातील असेही कंपनीने जाहीर आहे.
मारुती सुझुकीने मुंबई स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की, आम्हाला शंका आहे की मागील ब्रेक असेंबली पिन (भाग) मध्ये दोष आहे. ज्यामुळे प्रवास करताना खूप आवाज येतो. या खराबीमुळे दीर्घ कालावधीत ब्रेकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने सदोष भागांच्या चाचणीसाठी वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
बदलीची व्यवस्थाही केली जात असल्याचे कंपनीने सांगितले. मारुती सुझुकी स्वतः आपल्या ग्राहकांशी संपर्क साधेल ज्यांच्या कारमध्ये बिघाड आहे. मारुती सुझुकीने सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीसाठी स्वतंत्र निव्वळ नफा जाहीर केला, जे दर्शविते की कंपनीचा स्वतंत्र निव्वळ नफा चार पटीने वाढून २०६२ कोटी रुपयांवर गेला आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल जवळपास ४६ टक्क्यांनी वाढून २९,९३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर या तिमाहीत एकूण विक्रीचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत ३६ टक्क्यांनी वाढून ५ लाख १७ हजार ३९५ युनिट्सवर पोहोचले आहे.
Maruti Suzuki 9 Thousand Cars Recall