मुंबई – मारुती सुझुकीच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कंपनीने आपल्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या एकूण १.८१ लाख कार परत मागविल्या आहेत. या वाहनांमध्ये सुरक्षेसंदर्भात त्रुटी असल्याची शक्यता असून, कंपनी याबाबत तपासणी करणार आहे. कंपनी अशा ग्राहकांना मारुती सुझुकी कार्यशाळेत बोलावणार आहे. या वाहनांची निर्मिती २०१८ ते २०२० दरम्यान करण्यात आली होती.
मारुती सुझुकीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, पेट्रोल इंजन असलेल्या Ciaz, S-Cross, Vitara Brezza, Ertiga, आणि XL6 या वाहनांचा समावेश आहे. ४ मे २०१८ ते २७ ऑक्टोबर २०२० दरम्यान निर्मिती केलेल्या वाहनांमध्येच त्रुटी आढळलेल्या आहेत. त्या दरम्यान निर्मिती झालेल्या १,८१,७५४ कारमध्येच उत्पादनातच दोष असल्याची मारुती सुझुकी कंपनीला शंका आहे. या वाहनांच्या मोटर जनरेटर युनिटची तपासणी करून त्रुटी आढळल्यास कंपनीकडून वाहने मोफत बदलून देण्यात येतील.
तुमच्या कार परत बोलावल्या गेल्या आहेत किंवा नाही, हे तुम्हीसुद्धा जाणून घेऊ शकतात. त्यासाठी तुमच्या मॉडेलनुसार, मारुती सुझुकी किंवा नेक्साच्या संकेतस्थळावर लॉगइन करा. तिथे वाहनाचा व्हिकल चेसी नंबर (MA3, त्यानंतर १४ आकड्यांचा न्युमेरिक नंबर) नोंदवा. यावरून तुम्हाला गाडीची तपासणी करावी की नाही, याबाबत माहिती मिळेल.