मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या एसयूव्ही मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या ब्रेझाने धुमाकूळ घातला आहे. इतर स्पर्धकांना मागे टाकत ब्रेझाने स्वत:चे अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सध्या ब्रेझा खरेदी करणाऱ्यांची संख्या इतकी आहे की, बुकिंग केल्यानंतर ३०० दिवसांच्या वेटिंगनंतर गाडीची डिलिव्हरी होत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून ब्रेझाची विक्री नेक्सॉनपेक्षा उत्तम असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले आहे. परंतु, या कारला असलेली तगडी डिमांड ग्राहकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. कारण एप्रिल महिन्यापर्यंत या कारवरील वेटिंग पीरियड १५० दिवस म्हणजेच पाच महिने इतका होता. जो आता ३०० दिवसांपर्यंत वाढला आहे. म्हणजेच तुम्ही मारुती सुझुकी ब्रेझा कार आज बूक केली तर तुम्हाला कारच्या डिलीव्हरीसाठी तब्बल १० महिने वाट पाहावी लागेल.
मार्च महिन्यात कंपनीला या कारसाठी १६ हजारांहून अधिक बूकिंग्स प्राप्त झाल्या आहेत. या कारसाठी मोठा वेटिंग पीरियड असूनही ही कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी लाईन लागलेली आहे. न्यू ब्रेझा कारच्या न्यू जनरेशन के-सिरीज व्हेरिएंटमध्ये १.५ लीटर डुअल जेट डब्ल्यूटी इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजीसह सुसज्ज आहे. यात ६ स्पीड ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. हे इंजिन १०३ बीएचपी पॉवर आणि १३७ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते.
असे आहेत फीचर्स
कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, या कारची इंधन कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे. या कारचे मॅन्युअल व्हेरिएंट २०.१५ किमी प्रति लीटर इतके मायलेज देते. तर या कारचे ऑटोमॅटिक व्हेरिएंट १९.८० किमी प्रति लीटर इतके मायलेज देण्यास सक्षम आहे. ही कार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा एकूण चार ट्रिम्समध्ये येते. ऑल-न्यू हॉट ब्रेझा कारमध्ये बलेनो कारसारखा ३६० डिग्री कॅमेरा, ९ इंचांची स्मार्टप्ले प्रो प्लस टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, वायरलेस चार्जिंग डॉक देण्यात आली आहे.
Maruti Car 300 Days Waiting Period Features