विशेष प्रतिनिधी, मुंबई
देशातील सर्वांत मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने स्वस्त आणि उत्तम मायलेज देणाऱ्या गाड्यांसाठी जगभरात लोकप्रियता मिळविली आहे. आता जुलै महिन्यात मारुतीने एरिना आणि नेक्सा या दोन्ही शोरूम गाड्यांच्या किंमतीवर मोठे डिस्काऊंट घोषित केले आहेत. एवढेच नव्हे तर सर्वाधिक लोकप्रिय मारुती आल्टोवरही मोठी सवलत ग्राहकांना मिळणार आहे.
मारुतीच्या या गाड्यांची खरेदी करताना भारतातील ग्राहकांना मोठी सवलत प्राप्त करता येणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटातून जरासा दिलासा मिळाला असेल तर भारतातील मध्यमवर्गिय ग्राहक आपले चारचाकीचे स्वप्न पूर्ण करू शकतात.
मारुती आल्टोच्या खरेदीवर या महिन्यात तुम्हाला तब्बल ४३ हजार रुपयांची बचत करता येणार आहे. यात २५ हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काऊंट आणि १५ हजार रुपयांचा एक्स्चेंज बोनस मिळणार आहे. या कारवर कंपनीने ३ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट देण्याचीही घोषणा केली आहे. याशिवाय मारुती एस-प्रेसोवरही ४३ हजार रुपयांची सवलत देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
मारुती आल्टो एकूण ६ व्हेरियंट्समध्ये उपलब्ध असून या कारचे बेस मॉडेल २ लाख ९९ रुपयांना उपलब्ध आहे. तर टॉप मॉडेलची किंमत ४ लाख ६० हजार रुपये आहे. कंपनीने यात 796cc क्षमतेचे पेट्रोल इंजिन लावले आहेत, जे 40.3bhp ची पॉवर आणि ६०Nm चा टॉर्क जेनरेट करते. ही कार सर्वसाधारणपणे २२ किलोमीटर प्रती लिटर एवढे मायलेज देते. मारुती कंपनी आल्टोच्या नेक्स्ट जनरेशन मॉडेलवरही काम करीत आहे. याचवर्षीच्या अखेरीस हे मॉडेलही मार्केटमध्ये आणले जाऊ शकते. या नव्या मॉडेलमध्ये कंपनी मोठ्या प्रमाणात बदल करणार आहे.