नवी दिल्ली – भारतासारख्या देशासमोर दहशतवादाचे मोठे आव्हान असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेलगत वारंवार दहशतवादाची समस्या मोठी आहे. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमक होत असते. यात सुरक्षा जवान शहीद होतात. याची दखल घेत आज राज्यभेमध्ये यासंदर्भातील प्रश्न खासदार राहुल कनवाल यांनी विचारला. त्यास संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी लेखी उत्तर दिले. भट्ट यांनी सांगितले की, २०१९ या वर्षामध्ये दहशतवाद्यांशी केलेल्या मुकाबल्यात भारताचे ८० जवान शहिद झाले. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ६२ जवानांनी देशासाठी प्राणार्पण केले. तर, यंदा गेल्या सहा महिन्यात (जानेवारी ते जून) १६ जवान शहिद झाले असल्याचे भट्ट यांनी सांगितले आहे. म्हणजेच, गेल्या अडीच वर्षात भारताचे १५८ जवान शहिद झाले आहेत. दिवसेंदिवस दहशतवादाचा धोका वाढत आहे. तो कमी होण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. आता तर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी डोके वर काढले आहे. त्याचाही मोठा फटका भारताला बसणार असल्याचे दिसून येत आहे.