कानपूर (उत्तर प्रदेश) – प्रेमात आंधळी झालेली व्यक्ती कुठले पाऊल उचलेल याचा काही नेम नाही. त्यातही उत्तरप्रदेश, बिहार किंवा दिल्लीमध्ये तर अनोख्या प्रेमकथा बघायला मिळतात. अलिकडेच जनपद येथे भर चौकात नणंदेला धक्का देऊन एक विवाहित महिला आपल्या प्रियकराच्या बाईकवर बसून पसार झाली. हा संपूर्ण प्रकार अचानक घडल्याने नणंदही अवाक् झाली.
दोन दिवसांपूर्वी नणंद आणि तिची वहिनी बाजारातून भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. दोघींनीही बऱ्यापैकी बाजारात फेरफटका मारला. भाजीची एक पिशवी नणंदेजवळ होती तर दुसरी पिशवी वहिनीजवळ. घराच्या दिशेने निघताना वहिनीने आपल्या हातातील पिशवी नणंदेच्या हातात दिली आणि दोन मिनीटे थांबायला सांगितले.
नणंदेला वाटले हात दुखला असेल किंवा पायाला काही रुतले असेल. त्यामुळे ती शांत उभी राहिली. अगदी दोनच मिनिटांत एक सुसाट बाईक दोघींजवळ येऊन थांबली आणि वहिनीचा वेगळाच अवतार नणंदेला बघायला मिळाला. तिने डोक्यावरील पदर ऐटीत काढून फेकला आणि अवघ्या काही सेकंदात बाईकवर बसली. नणंदेला काही कळले नाही. तिने हात धरण्याचा प्रयत्न केला तर लाडक्या वहिनीने तिला जोरदार धक्का दिला. त्यात ती भाजीच्या पिशवीसह पडल्यामुळे जोरदार मार लागला.
गंमत म्हणजे हा सारा प्रकार अवघ्या २ ते ३ मिनिटांमध्ये घडला. पण तो एवढा अचंबित करणारा प्रकार होता की, चौकात उभी असलेली प्रत्येक व्यक्ती फक्त बघतच राहिली. काहींना मोबाईलमध्ये व्हिडीओ घेण्याचे सूचले पण खिशातून मोबाईल काढेपर्यंत वहिनी प्रियकरासोबत पसार झाल्या होत्या.
पंधरवाड्यात दुसऱ्यांदा
जखमी झालेली नणंद घरी पोहोचल्यावर तिने भावाला आणि कुटुंबियांना सांगितले. साऱ्यांनाच आश्चर्य वाटले. पण नवऱ्यासाठी हे ‘सरप्राईज’ नव्हते. कारण १५ दिवसांपूर्वी सुद्धा बायको पळून गेली होती आणि संदीप नावाच्या मुलासह तिला पकडले होते, असे त्याने घरच्यांना सांगितले. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आणि पुन्हा एकदा वहिनींचा शोध सुरू केला आहे.