नाशिक – विवाहीतेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीसह सासू सास-यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना जेलरोड येथील दसक भागात घडली होती. विशाल खंडू महाजन,कमळाबाई महाजन व खंडू भादू महाजन (रा.सर्व रेणूका सदन,सदगुरू मंगल कार्यालय,दसक) अशी अनुक्रमे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पती व सासू सास-यांची नावे आहेत.
पुनम उर्फ रूपाली विशाल महाजन या विवाहीतेने २२ जानेवारी २०१६ रोजी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. याप्रकरणी विवाहीतेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घर व गाळा घेण्यासाठी माहेरून पैसे आणावे तसेच दोन्ही मुलीच झाल्या या कारणातून आपल्या मुलीचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप पालकांनी केला होता.
या गुन्ह्याचा तपास उपनगरचे तत्कालिन उपनिरीक्षक एस.ए.सदाफुले यांनी करून पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला न्या.श्रीमती एस.एस.नायर यांच्या कोर्टात चालला. सरकार तर्फे अॅड.आर.एम.कोतवाल यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी हवालदार के.के.गायकवाड व शिपाई आर.आर.जाधव यांनी सहाय्य केले.
न्यायालयाने पती विशाल महाजन यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दहा वर्ष सश्रम कारावास आणि पाच हजार रूपये दंड तर त्याच्या आई वडिलांना याच गुन्ह्यात प्रत्येकी सात वर्ष सश्रम कारावास आाणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तर विवाहीतेचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्या प्रकरणी तिन्ही आरोपींना ३ वर्ष सश्रम कारावास आाणि २ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.