पुणे – आपल्याकडे अजूनही मुलींना परक्याचे धन म्हणूनच वाढवले जाते. पूर्वीच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमी असले तरीही ही परिस्थिती अजूनही आहे. त्यातच लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरी आल्या की पुन्हा त्यांना आई वडिलांकडून काही ना काही सूचना मिळत असतात. मुलींना सासरी काहीही त्रास होऊ नये, म्हणून काळजीपोटी जरी या सूचना दिल्या जात असल्या तरी यामुळे अनेकदा मुली दुखावल्या जातात. तुम्हाला माहीत आहेत का मुली कशाने दुखावल्या जातात? त्या गोष्टी आम्ही सांगतो तुम्हाला.
सासरी ऍडजस्ट करून घे – लग्न झाल्यानंतर खरं तर मुलगा – मुलगी या दोघांचेही आयुष्य बदलत असते. तरीही ही सूचना मुलींनाच कायम दिली जाते. यामुळे मुलींना वाईट वाटते.
आमचे नाव खराब होईल असं वागू नकोस – सासरी गेल्यावर मुली आपापल्या परीने त्या वातावरणाशी, नवीन माणसांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत असतात. पण पालकांनीच असं सांगितल्यावर त्यांना दडपण येत. आपल्या माहेरच्यांना काही बोल लागू नयेत यामुळे त्या अनेकदा स्वतःच्या स्वभावाविरुद्ध वागतात.
आता तेच तुझे घर आहे – ज्या घरात आपले बालपण गेले, जिथे खेळलो, बागडलो ते घर अचानक परकं होणं, हे काय असतं, ते मुलींनाच कळत असतं. त्यात आपल्या आई वडिलांनीच असं सांगणं म्हणजे आपला त्यांच्याशी संबंध संपल्यासारखंच त्यांना वाटतं.
असा परिवार मिळणे, हे तुझे भाग्य आहे – काळानुसार हल्ली मुलांनाही घरातील कामांची माहिती, सवय असावी लागते. त्यामुळे अनेकदा नवरे बायकांना घरकामात मदत करत असतात. यामुळे आपली मुलगी कशी सुखात आहे, हेच तिला सांगितलं जातं. याने कधी कधी मुली दुखावल्या जातात.
लग्नानंतर नवरा-बायको दोघेही नोकरी करतात. पण जर वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात जर समतोल साधता आला नाही तर नेहमी बायकोलाच तडजोडीचा सल्ला दिला जातो. आणि यात तिचे पालकही मागे नसतात. आपल्या पालकांनी आपल्याला समजून न घेणे, ही गोष्ट तिला लागते.
लग्नानंतर कसं वागावं, याचं प्रशिक्षण तर लग्न ठरल्यापासूनच मुलींना मिळत असत. पण इतरांसाठी आपण संपूर्णपणे बदलणं मुलींना तितकंसं रुचत नाही.