गोरखपूर (उत्तर प्रदेश) – नवरा मुलगा कन्फर्म तिकिटाच्या प्रतीक्षेत आहे, तर नवरी क्वारंटाइन झालेली आहे. आता लग्नाला तीनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे लग्न कसे होणार, हाच प्रश्न दोन्हीकडच्या कुटुंबीयांना सतावत आहे. चित्रपटात शोभेल अशीच घटना प्रत्यक्षात घडत आहे. अगदी लग्नाच्या दिवसापर्यंत ही उत्कंठा ताणली जातेय की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेशातील पिपराईच गावात राहणाऱ्या श्याम आणि शालिनी यांचा विवाह होणार आहे. श्याम दिल्लीत नोकरी करतो आणि शालिनी मुंबईत असते. शालिनी १८ एप्रिलला गोरखपूरला पोहोचली असून, कोविड नियमानुसार ती गृहविलगीकरणात आहे. १८ एप्रिलपासून श्यामला रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने तो हैराण झाला आहे. त्याला कन्फर्म बर्थ तिकीट मिळत नाहीये.
बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने एवढ्या दूरच्या प्रवासाचा धोका घेऊ शकत नसल्याचे श्यामचे म्हणणे आहे. कोरोनामुळे त्याने नातेवाईकांना आमंत्रित केले नाही. परंतु तिकीट मिळो न मिळो ठरलेल्या दिवशीच लग्न करण्याचा निर्धार त्याने केला आहे. दिल्ली ते गोरखपूर असा बाईकने प्रवास करण्याची तयारीही त्याने केली आहे.
रेल्वेत जागा मिळाली नाही तर बाईकची टाकी फुल भरून गोरखपूरला निघणार असल्याचे श्यामने सांगितले. दिल्ली ते गोरखपूर रस्त्याचा प्रवास २० तासांचा आहे. तिथे पोहोचल्यानंतर कोरोनाची तपासणी करून ठरलेल्या दिवशी आणि वेळेवर अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार आहे.
विलगीकरणात असलेल्या शालिनीला कोरोनाचा कोणताच त्रास झालेला नाही. कोरोनाची लक्षणेही नाहीत. श्याम निर्धारित वेळेत आल्यावर दोघेही लग्न करणार आहोत, असे शालिनीने सांगितले. त्यांच्यामुळे नातेवाईकांना त्रास नको म्हणून १५-२० जणांच्या उपस्थितीत लग्न करण्याचे नियोजन केले आहे. कोरोनाच्या नियमांच्या पालनासह लग्नसोहळाही होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.