नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रातील सत्ताधारी पक्षाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर विरोधकांनीही त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून उमेदवार असतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी १७ विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आज झाली. त्यात अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्गारेट अल्वा कोण आहेत आणि त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे? हे जाणून घेऊया…
कर्नाटकातील मंगळुरू येथे जन्मलेल्या ८० वर्षीय अल्वा या गोवा, गुजरात, राजस्थान आणि उत्तराखंडच्या राज्यपाल राहिलेल्या आहेत. अल्वा यांची दीर्घ राजकीय कारकीर्द आहे. काँग्रेसच्या खासदार असताना त्यांनी चार वेळा केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रीपदही भूषवले आहे.
काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा १९७४ मध्ये पहिल्यांदा खासदार झाल्या. राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण पाच वेळा त्या खासदार होत्या. १९९९ मध्ये त्यांनी उत्तर कन्नडमधून लोकसभा निवडणूक जिंकली. खासदार म्हणून त्यांनी महिला कल्याणासाठी अनेक कायदे करण्यात प्रभावी भूमिका बजावली. काँग्रेस सरकारमध्ये महिला सक्षमीकरणाशी संबंधित धोरणे तयार करण्यात आणि मंजूर करण्यात अल्वा यांचा मोठा वाटा आहे.
https://twitter.com/alva_margaret/status/1548636129636671489?s=20&t=7oWS8kowyophpABJOdgPrw
केंद्रातील यूपीए सरकारच्या काळात ६ ऑगस्ट २००९ रोजी त्यांना उत्तराखंडचे राज्यपाल बनवण्यात आले. यानंतर त्यांना गुजरात, राजस्थानचे राज्यपालही करण्यात आले. एका महिलेच्या वतीने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१२ मध्ये मर्सी रवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “आमची एकत्रित विचारसरणी अशी आहे की उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून अल्वा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील. एकूण १७ पक्षांनी एकमताने अल्वा यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तृणमूल काँग्रेस आणि आमचा पाठिंबा आहे. आम आदमी पक्षासह एकूण १९ पक्षांच्या त्या संयुक्त उमेदवार असतील.
Margaret Alva is opposition candidate for Vice President election