इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाघ, सिंह, बिबट्या, चित्ता अशा प्राण्यांचं, त्यांच्या रुबाबदारपणाचं आपल्याला नेहमीच आकर्षण असतं. त्यांना बघायची कितीही इच्छा असली तरी प्रत्यक्षात ते समोर आले की आपली तंतरते. असाच काहीसा अनुभव नुकताच गोरेगाव फिल्मसिटीत चित्रीकरण करत असणाऱ्या कलाकारांना आला.
२६ जुलै या तारखेची मुंबईकरांच्या मनात आधीपासूनच धास्ती आहे. ती धास्ती खरी ठरावी असच पाऊस सध्या मुंबईत कोसळतो आहे. यातच अजून टेन्शन देणारी एक घटना मुंबईतील गोरेगाव परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीमध्ये स्टार प्रवाहवरील सुप्रसिद्ध मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. ते सुरू असतानाच मालिकेच्या सेटवर संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक एक बिबट्या आपल्या बछड्यासह घुसला. हा बिबट्या सेटवर आला तेव्हा तिथे कलाकारांसह एकूण २०० जण होते. सुदैवाने बिबट्याने इथे कोणावरही हल्ला केला नाही. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे सर्वांची भीतीने गाळण उडाली. बिबट्या सेटवर आल्याने सगळ्यांची एकच धांदल उडाली आणि सुरक्षित ठिकाण शोधण्यासाठी सगळे इकडे तिकडे पळू लागले.
दहा दिवसातील दुसरी घटना
दहा दिवसातील ही दुसरी ते तिसरी घटना आहे की, अचानक सेटवर बिबट्या घुसला आहे. यामुळे कलाकार आणि येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
जंगलाचा भाग असल्याने धोका
गोरेगाव फिल्म सिटी हा भाग जंगलसदृश आहे. इथे अनेक टेकड्या आणि मोठ्या प्रमाणत झाडंझुडपं आहेत. येथील परिसरात बिबट्या आणि काही श्वापदांचा वावर असतो. काही महिन्यांपासून बिबटे हे थेट येथील सेटमध्ये घुसत आहे. अनेक सेटवर बिबट्याला रोखण्यासाठी तारांच्या सुरक्षा जाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही बिबटे सातत्याने सेटवर येत असल्याने येथील कर्मचारी आणि कलाकारांमध्ये बरीच भीती बसली आहे.
आमचा जीव गेल्यावर सरकारला जाग येणार का?
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांनी याबाबत सांगितलं की, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मराठी मालिकेचे चित्रीकरण गोरेगाव फिल्म सिटीमध्ये सुरू होते. तेव्हाच सेटवर अचानक बिबट्या आपल्या बछड्यासह सेटवर घुसला. त्यावेळी तिथे दोनशेहून अधिक लोकं होते. अनेक सेटवर बिबट्या दिसत आहेत. त्यानंतरही सरकार कोणतीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही. हा मुद्दा मी विधानसभेपर्यंत पोहचवला. विधानसभेत हा मुद्दा आल्यानंतर देखील सरकार या महत्त्वपूर्ण मुद्द्याकडे अजिबात लक्ष देताना दिसत नाही. हा हजारो कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि तो तुमच्याच हाती आहे.” जर कोणत्याही कामगाराचा किंवा कलाकाराचा जीव गेला तर त्याला जबाबदार फक्त आणि फक्त महाराष्ट्र सरकारच असेल.”, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. सरकारने जर याबाबत ठोस उपाययोजना केली नाही तर हजारो कर्मचारी आणि कलाकारांसह आम्हाला उपोषण करावं लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. आणि फिल्मसिटीमधील सगळं काम हे बंद होईल.’