इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनासाठी म्हणून ओळखल्या जातात. आपले सगळे त्रास विसरून प्रेक्षक विशेषतः महिला वर्ग या मालिकांमधून आनंद घेत असतो. अनेकदा तर प्रेक्षक त्या मालिकेतील व्यक्तिरेखांशी एकरूप झाल्याचेही दिसते. असेच काहीसे भाग्य ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीच्या वाट्याला आले आहे.
अरुंधती अर्थात अभिनेत्री मधुराणी गोखले यांनी ही भूमिका अत्यंत समरसतेने साकारली आहे. कुटुंबालाच आपलं सर्वस्व मानणारी आणि नवऱ्याकडून विश्वासघात झाल्यानंतरही कुटुंबाची काळजी वहात स्वतःची वेगळी वाट चोखाळणारी प्रचंड लोकप्रिय आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमधून काही प्रमाणात का होईना मुक्तता झाल्याने आपल्या आवडत्या गोष्टी करण्याचे अरुंधतीने ठरवले आहे. पूर्वीपासून गाण्याची आवड असलेली ती आता पार्श्वगायनासोबतच आशुतोषच्या म्युझिक स्कूलमध्येही शिकवते आहे. हा तिचा संपूर्ण प्रवास नक्कीच लक्षवेधी आहे.
मालिकेतील अरुंधती तिच्या आवाजाने सगळ्यांनाच मोहून टाकते. तिच्या सुमधूर आवाजाचे अनेक चाहते आहेत. अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी देखील खऱ्या आयुष्यात एक उत्तम गायिका आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मालिकेच्या एका भागात अरुंधती अंगाई गाताना दिसली होती. ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातील ‘बाळाला झोप का गं येत नाही’ ही प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी गायलेली अंगाई आहे.
अरुंधती अर्थात मधुराणीने तिच्या सोशल मीडियावर मालिकेतील अंगाई गातानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. “सलीलने बांधलेली गाणी गाणं हा गाणाऱ्याला समृद्ध करणारा अनुभव असतो. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एकदा काय झालं’ ह्या सुंदर चित्रपटातली ही हळवी अंगाई. ‘आई कुठे काय करते’मध्ये माझ्या नशिबाने मला अनेक गाणी गाण्याची संधी मिळते आणि त्या निमित्ताने नवीन गाणी बसवलीही जातात. गाण्याचं धाडस केलंय. गोड मानून घ्या”, असं मधुराणीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मधुराणीच्या या पोस्टवर सलील कुलकर्णी यांनी देखील कमेंट केली आहे. “वाह…तू नेहमीच मन लावून गातेस”, या शब्दात त्यांनी मधुराणीचे कौतुक केले आहे. सलील कुलकर्णी यांनीही त्यांच्या सोशल मीडियावरुन अरुधंतीने गायलेल्या अंगाईचा व्हिडीओ शेअर केला होता. याशिवाय चित्रपटातील त्यांची अंगाई घेतल्याने त्यांनी मालिकेच्या टीमचे आभारही मानले. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अरुंधतीचा मोठा मुलगा डॉ. अभिषेक हा देखील त्याचे वडील – अनिरुद्धच्या पावलावर पाऊल ठेवत त्याची पत्नी अनघा हिला फसवताना दिसतो आहे. नुकतीच अभिषेक आणि अनघाला मुलगी झाली आहे. परंतु, अभिषेकने अनघाचा विश्वासघात केल्यामुळे आता अनघा काय निर्णय घेते, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.
Marathi TV Serial Actress Post Viral