इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील मालिका पाहणे हा घरोघरीच्या गृहिणींचा वेळ घालवण्याचा अत्यंत आवडता पर्याय आहे. ‘झी मराठी’ वरील अनेक मालिका महिलांमध्ये लोकप्रिय असतात. काही काळापासून ‘स्टार प्रवाह’ने देखील वेगळे विषय देत या स्पर्धेत स्वतःचे स्थान निर्माण केले. ‘स्टार प्रवाह’ वरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. ही मालिका टीआरपीमध्ये सातत्याने वरच्या क्रमांकावर आहे.
या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेतील आई अर्थात अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. नेमक्या याच कारणावरून अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर ट्रोल होते आहे. मालिका देखील ट्रोल होते आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभूलकरने नुकतंच यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर मध्यवर्ती भूमिकेत आहे. सध्या या मालिकेत आईचं म्हणजेच अरुंधतीच्या लग्नानिमित्त विविध कार्यक्रम सुरू आहेत. अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न ठरल्यापासून दोघांच्या लग्नात काही ना काही विघ्न येत आहेत. अरुंधतीने नुकताच इन्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच वाहिनीचे आभार मानले आहेत.
मधुराणी म्हणते, कोणाही व्यक्तीला सोबतीची गरज असतेच. एकट्या व्यक्तीला ती अधिकच भासते. त्यामुळेच कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. त्याचा सोहोळा साजरा झाला तर त्यात टीका करण्यासारखे काय आहे? केवळ दुसरे लग्न हा मुद्दा असू शकतो का? पण मला नक्की असं वाटतं की , ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का ? लग्न आहे ते… साजरं करावं. इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णी आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.”, अशी पोस्ट मधुराणी प्रभूलकरने केली आहे.
https://twitter.com/StarPravah/status/1634204002450817024?s=20
मधुराणी प्रभूलकरच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. या पोस्टवर कमेंट करताना अनेकांनी “आम्ही सहमत आहोत, असे म्हटले आहे. तर एकाने ‘खूप छान चालली आहे आई कुठे काय करते मालिका”, असे म्हटले आहे.
https://twitter.com/StarPravah/status/1634200153153499137?s=20
Marathi TV Serial Aai Kuthe Kay Karte Troll in Social Media