इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे. यातील कोणत्याही घटनेवर प्रेक्षकांचे लक्ष असते, आणि त्यावर प्रेक्षक व्यक्त देखील होतात. काही चांगले घडले तर कौतुक करतात, तसेच काही चुकीचे घडले तर त्यावर सडकून टीका देखील करतात. याचाच प्रत्यय नुकताच अभिनेता मिलिंद गवळी यांना आला आहे. तसं तर त्यांना हा अनुभव नेहमीच येतो आहे.
या मालिकेतील मिलिंद गवळी यांची या मालिकेतील भूमिका दिवसेंदिवस नकारात्मक होत चालली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल होण्याचे त्यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपासून या मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट सुरू आहेत. आता ईशा आणि अनिशचा साखरपुडा झाल्यानंतर अनिरुद्ध हा ईशा आणि अनिशच्या लग्नाला विरोध करत असल्याचे दिसते आहे. तर दुसरीकडे वीणा अनिरुद्धला नोकरीवरुन काढून टाकते. त्यामुळे तो संतापला आहे. यावरुन आता अनिरुद्ध फेम अभिनेते मिलिंद गवळी ट्रोल होत आहेत.
मिलिंद गवळी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यामुळे अनेकदा ते ट्रोलर्सना उत्तर देताना दिसतात. सध्या मालिकेत आलेल्या ट्वीस्टमुळे प्रेक्षक अनिरुद्ध या पात्राचा प्रचंड द्वेष करत आहेत. मिलिंद गवळी यांच्या एका पोस्टखाली एका महिलेने कमेंट केली आहे. ‘अजून किती खालच्या पातळीला जाऊन दुष्टपणाचा कळस गाठणार आहात. लाज वाटते’, अशी कमेंट करण्यात आली आहे. त्यावर मिलिंद गवळी कोणतीही चिडचिड न करता, त्रागा न करता अत्यंत शांततेत उत्तर दिले आहे. “नमिताला माहिती असणार”, असे उत्तर मिलिंद गवळींनी यावर दिले आहे. तर एका व्यक्तीने “मिलिंद गवळी हे खऱ्या आयुष्यात खूप चांगले आहेत. ती मालिका आहे”, असे कमेंट करत म्हटले आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.