इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आवाजांचा बादशहा, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक, संगीत दिग्दर्शक, दिग्दर्शक, निर्माता म्हणून अवधूत गुप्तेला ओळखले जाते. त्याच्या गाण्यामुळे त्याने सिनेसृष्टीत आणि गाण्याच्या जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. विविध राजकारण्यांसाठी देखील अवधूतने आजवर गाणी गायली आहेत. आता अवधूत गुप्ते त्यापैकीच एका पक्षात सक्रिय सहभाग घेत प्रवेश करणार आहे. नुकतंच अवधूत गुप्तेने राजकारणात येण्याची मोठी घोषणा केली आहे.
अवधूत गुप्ते काही दिवसांपासून विविध राजकीय पक्षांच्या मंचावर झळकला होता. त्यामुळे तो लवकरच राजकारणात सक्रीय होऊ शकतो, याबद्दलच्या चर्चांना उधाण आले होते. आता एका मुलाखतीत अवधूत गुप्तेने याबद्दल घोषणा केली आहे. तो म्हणाला की, “कोणतीही निवडणूक आली की मला विचारणा होतेच. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश करणार आहे हे आता जाहीरच करुन टाकतो. कशासाठी राजकारणात यायचं किंवा कोण चांगलं राजकारण करु शकतं? ज्यांना स्वत:चं पोट भरायची भ्रांत नाही, तो चांगल राजकारण करु शकतो. आता माझ्या कर्तव्यांची इतिकर्तव्यता होईल. संसार, कुटुंबाप्रती असलेल्या जबबादाऱ्या संपलेल्या असतील, जेव्हा काही मिळवायचं नाही किंवा काही गमवायचं नाही अशा वेळी मी राजकारणात येईन, असेही त्याने म्हटले आहे.
२०१९ च्या आमदारकीपासून मी हे सगळं पाहतोय. त्यावेळी लोक माझ्या राजकारणात येण्यामागे माझा काही हेतू आहे अशी शंका घेऊ शकणार नाही. मलाही खात्री आहे की, मी समाजकार्यासाठी म्हणून राजकारणात येईन. मी राजकारणासाठी प्रामाणिकपणे फक्त पाच वर्षच देईन. आपण घर साफ करतो, ती प्रत्येकाने आपली छोटीशी चौकट काही काळापुरती प्रामाणिकपणे साफ केली तर भारत बदलायला वेळ लागणार नाही. मी ज्या दिवशी येईन तेव्हा जाण्याचीही तारीख जाहीर करेन”, असे अवधूत गुप्तने म्हटले.
अवधूत गुप्ते याने म्हटल्याप्रमाणे फक्त पाच वर्षासाठी राजकारणात येणार असला तरी तो कधी राजकारणात येणार याबद्दल त्याने काहीही सांगितलेले नाही. त्याबरोबरच अवधूत गुप्ते कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश घेणार, याबद्दलही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पक्ष कोणताही असो त्याला आपल्या गाण्यातून न्याय देणारा अवधूत कोणत्या पक्षाचे चिंतन करतोय हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
https://twitter.com/AvadhootGupte/status/1616705139368394752?s=20&t=Tc8bJ8LGIy4-gc6MpmLV-Q
Marathi Singer Avdhoot Gupte Politics Entry