मराठी संशोधन मंडळाचे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असताना मराठी संशोधन मंडळ 1 फेब्रुवारी 2022 रोजी 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त मंडळाचे संचालक डॉ. प्रदीप कर्णिक यांनी मंडळाच्या वाटचालीविषयी दिलेली माहिती…
मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या शतसांवत्सरिक पुण्यतिथीनिमित्त प्रा. अ. का. प्रियोळकर यांनी मराठी संशोधन मंडळाची संकल्पना मांडली. त्यावेळच्या मुंबई राज्याचे प्रथम मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी सरकारी मदतीचे आश्वासन दिल्यानंतर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने पुढाार घेत संशोधन कार्यासाठी वाटचाल सुरू केली. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1948 रोजी मराठी संशोधन मंडळाची स्थापना झाली. ही संस्था मुंबई विद्यापीठाशी सलंग्न आहे.
मराठी वाड्मय संशोधनाचे कार्य 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाले. मात्र, सुरवातीला पोषक, अनुकूल वातावरण नव्हते. स्वतंत्र संशोधनाचे केवळ कार्य करणारी संस्था महाराष्ट्रात असली पाहिजे, असे रिझर्व्ह बँकेचे तत्कालिन गव्हर्नर चिंतामणराव द्वारकादास देशमुखांनी रा. भि. गुंजीकर व्याख्यानमालेत अध्यक्षस्थानावरून बोलताना केले होते. याच व्याख्यानमालेत प्रा. प्रियोळकर यांनी ‘जुन्या मराठी वाड्मयाचे संशोधन व प्रकाशन’ हा निबंध सादर केला होता. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाने पुढाकार घेतला. त्यासाठी भा. वि. वरेरकर, अनंत हरी गद्रे, अ. का. प्रियोळकर, वा. वि. भट, दि. पु. धूपकरांचे शिष्टमंडळ तत्कालिन मुख्यमंत्री बाळासाहेब खेरांना भेटले होते. त्यानंतर या संस्थेचा जन्म झाला. मराठी संशोधन मंडळाचे पहिले संचालक प्रा. कृ. पां. कुलकर्णी होते. त्यांच्यापासून प्रा. अ. का. प्रियोळकर, डॉ. स. ग. मालशे, प्रा. रा. भि. जोशी, प्रा. म. वा. धोंड, प्रा. सुरेंद्र गावस्कर, प्रा. रमेश तेंडुलकर (जगदविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे वडील), प्रा. वसंत दावतर, डॉ. दत्ता पवार यांनी संचालकपद सांभाळले असून त्यांनी मराठी संशोधन मंडळाचा नावलौकिक वाढविण्यात योगदान दिले आहे.
मराठी भाषा व वाड्मय व अनुषंगिक विषयासंबंधी संशोधन करणे आणि संशोधनास साहाय्य करणे, प्राचीन व महत्वाच्या ग्रंथांची हस्तलिखिते व पोथ्या वगैरे मिळविणे, ती हस्त लिखिते मिळाली नाहीत, तर त्यांचे प्रति लेख काढणे, प्राचीन व मध्यकालिन शिलालेख, ताम्रपटाच्या प्रतिकृती तयार करून त्या प्रकाशनासाठी सिद्ध करणे आणि त्यांचे प्रकाशन करणे, सेंट पीटसबर्ग कोश किंवा ऑक्सफड इंग्रजी कोश यांच्या पद्धतीवर मराठी भाषेचा संपूर्ण कोश करणे, एम. ए. व पीएच. डीच्या विद्यार्थ्यांना व इतर संशोधनेच्छूक अभ्यासकांना संशोधनाच्या बाबतीत मार्गदर्शन करणे असे संशोधन मंडळाचे उद्दिष्ट होते. संशोधन प्रकल्प, कोश प्रकल्प, सूची कार्य, प्रकाशने, मराठी संशोधन पत्रिका- त्रैमासिक, हस्तलिखितांचा संग्रह, सूक्ष्म पटांचा संग्रह, ग्रंथालय, शैक्षणिक कार्य, निबंध वाचन, कार्यक्रम व इतर समारंभ असे मंडळाचे कार्य राहिले आहे. मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून पां. वा. काणे यांनी काम पाहिले. त्यांनी 1961 पर्यंत मंडळाचे नेतृत्व केले.
1850 मध्ये मेजर कँडीने विराम चिन्हांची परिभाषा नावाची पुस्तिका लिहिली होती. त्याचे पुनर्मुद्रण मंडळाने केले होते. प्राचीन वाड्मयाबरोबरच मंडळाने 19 व्या शतकाकडेही लक्ष वेधले. प्रा. केरूनाना छत्रे यांची टिपणवही, गोविंद नारायण माडगावकर यांचे संकलित वाड्मय ही प्रा. प्रियोळकरांच्या काळात प्रसिध्द झालेली काही पुस्तके आहेत. लोकहितवादींचे सर्व गुजराती भाषेतील लेखन मंडळाचे जमा केले आहे. ते मराठीत आणायचे आहे. प्राचार्य विश्वास पाटील ते काम करत आहे. लोकहितवादींचे सर्व गुजराती भाषेतील लेखन मंडळाने जमा केले आहे. ते मराठीत आणावयाचे आहे. प्राचार्य विश्वास पाटील ते काम करीत आहेत. डॉ. मालशे यांनी शेठ माधवदास रघुनाथ दास यांच्या विधवा विवाहाच्या कहाणीच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती मंडळासाठी प्रकाशित केली आहे. ते आगस्कर, देवधर यांनी इंग्रजीवरून मराठीत आणले होते. पण, माधवदास यांनी लिहिलेले मूळ गुजराती भाषेतील पुस्तक मराठीत आलेले नाही. गुजराती आणि इंग्रजी पुस्तकात खूप तफावत आहे. इंग्रजीतील पुस्तकात अनेक तपशील आलेले नाहीत. त्यामुळे प्राचार्य विश्वास पाटील यांनी मूळ गुजराती पुस्तकाचा अनुवाद करून दिलाय तो प्रकाशित करतोय, असे डॉ. कर्णिक सांगतात.