नाशिक – येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ९४वे हे संमेलन ऐतिहासिक व्हावे यासाठी सर्वपरीने प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून या साहित्य संमेलनाचे गीत साकारण्यात आले आहे. हे गीत सध्या विशेष चर्चेचे ठरत आहे. हे गीत मिलींद गांधी यांनी लिहीले असून गायक संजय गीते यांनी गायले आहे. गीते यांनीच संगीत दिग्दर्शन केले आहे. समूहस्वर सौरभ कुलकर्णी, सागर कुलकर्णी, मयुरी निमोणकर, मृदुला कुलकर्णी, श्रावणी गीते यांचा आहे. बासरी वादन मनोज गुरव, तबला बल्लाळ चव्हाण, संगीय संयोजन अविनाश लोहार (मुंबई), एडिटिंग व ग्राफीक्स निलेश सूर्यवंशी यांचे आहे.
संमेलन गीताच्या माध्यमातून नाशिकमधील ऐतिहासिक व पर्यटनस्थळांना उजाळा देण्यात आला आहे. तसेच, नाशिकमधील आजवरचे साहित्यिक, लेखक आदींनाही मुजरा करण्यात आला आहे. नाशिकची आजवरची वाटचाल आणि महत्त्वही या गीतातून प्रकट होत आहे. यागीताद्वारे नाशिकचे मोठ्या प्रमाणात ब्रँडिंग होणार असून संमेलनाला येणाऱ्यांसमोर या गीताचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.