पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमळनेर येथे होत असलेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत हे साहित्य संमेलन होत आहे.
संमेलन अध्यक्ष पदाच्या संदर्भात आज पुण्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न. म. जोशी यांची नावे चर्चित होती. अखेर शोभणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हे संमेलन डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये घेणे प्रस्तावित आहे.
डॉ. रवींद्र शोभणे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच त्यांच्या विविध कादंबऱ्या अतिशय प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्यामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. अतिशय विपुल प्रमाणात त्यांनी लेखन केलेले आहे. त्यांच्या निवडीमुळे यंदाचे साहित्य संमेलन अतिशय उत्तमरित्या पार पडेल, अशी प्रतिक्रिया साहित्य क्षेत्रातून व्यक्त होत आहे