मुंबई – महाराष्ट्राला रंगभूमीचा समृध्द इतिहास असून हा इतिहास आणि वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्र येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी रंगभूमी कलादालनातून मराठी रंगभूमीच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन होईल या पध्दतीने या कलादालनाचे काम व्हावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
मराठी रंगभूमी कलादालनाच्या उभारणीसंदर्भातील बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, सिध्दीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिह, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, सर्वश्री अभिनेते राजन भिसे, विजय केंकरे, ऋषिकेश जोशी, नाट्य दिगदर्शक वामन केंद्रे, अभिनेत्री सई गोखले, ऑनलाईन पद्धतीने अभिनेते सुबोध भावे, यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले की, या रंगभूमी संग्रहालयाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीचा गौरवशालीइतिहास, रंगभूमीची वैशिष्ट्ये आणि वैभवशाली वाटचाल दृष्टिपथात येणे आवश्यक आहे. मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर चालणारी आहे. त्यामुळे मराठी रंगमंच कलादालनातून प्रेक्षकांना मराठी रंगभूमीची वाटचाल अनुभवता येण आवश्यक आहे. रंगभूमी कलादालन स्वयंपूर्ण आणि सक्षम होण्याबरोबरच नवीन पिढीलाही बांधून ठेवेल असे असणे आवश्यक आहे.
मराठी रंगमंच कलादालन येथे येणाऱ्या प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र तर व्हावेच, पण त्याचबरोबर रंगभूमीची वाटचाल उलगडवून दाखवणारे उत्तम असे संग्रहालय साकारण्यात यावे. कलादालनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास दृकृ-श्राव्य संग्रहालय, त्रिमिती सादरीकरणाची व्यवस्था याबरोबरच रंगभूमीच्या वाटचालीशी निगडीत शासनाच्या विविध विभागांकडे उपलब्ध संदर्भ, दस्तऐवज आदी गोष्टींबाबत समन्वय साधण्याचे आणि या कामाला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.
कलादालनाच्या निर्मितीकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूर्व उपनगराचे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली संहिता विकास समितीची (कंटेंट डेव्हलपमेंट कमिटी) स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय लवकरच हेरिटेज कमिटी (पुरातत्व समिती) ची स्थापनाही करण्यात यावी. मराठी रंगमंच कलादालनात नाटकाचा उगम ते आतापर्यंतचा प्रवास उलगडला जावा, संगीत, व्यावसायिक, प्रायोगिक रंगभूमी, दलित, कामगार नाट्य चळवळ आणि त्याची वैशिष्ट्ये माहित व्हावीत, जेष्ठ मराठी नाटककार, नेपथ्यकार, लेखक, नाट्य कलावंत यांचीही माहिती येथे उत्तम मांडणीतून उपलब्ध व्हावी असेही श्री.ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
भारतीय नाटक कलेच्या इतिहासात महाराष्ट्रातील रंगभूमीचे विशेष स्थान आहे. महाराष्ट्रातील नाट्य चळवळीचा इतिहास दीडशे वर्षांहून अधिक आहे. आधुनिक नाटकांची चळवळ महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीबरोबरच सुरु असून या नाट्य परंपरेचे संग्रहालयाच्या रुपाने जतन होणे आवश्यक आहे. या संग्रहालयात नवीन इमारत आणि त्यामध्ये नाट्यपरंपराच्या इतिहासाचे विविध टप्पे दर्शविणारी अनेक दालने उभारण्यात येणार आहेत. विशिष्ट काळातील नाटकांबद्दलची माहिती, छायाचित्रे, पॅनल्स, दृकश्राव्य माध्यमे, होलोग्राफीक टेक्नॉलॉजीचा वापर करुन प्रदर्शित करण्यावर कसा भर देण्यात येणार आहे याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.