पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ रानकवी ना धो महानोर यांचे आज येथे निधन झाले. त्यांचे वय ८१ वर्षे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या, शुक्रवार, ४ ऑगस्ट रोजी जळगाव-औरंगाबादरोडवरील पळसखेड या गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या निधनाने काव्य आणि साहित्य, संस्कृती क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
महानोर हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यातच त्यांना हृदयविकाराचा त्रास होत होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना येतील रुबी क्लिनिकमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांची प्रकृती आणखी खालावली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर त्यांची प्राणज्योत आज सकाळी मालवली.
पळसखेड (जि. अहमदनगर) हे महानोर यांचे जन्मगाव आहे. त्यांचे शालेय शिक्षण ग्रामीण भागातच झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी जळगाव येथे आले. तेथे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले पण ते अर्धवट अवस्थेतच सोडले. त्यानंत त्यांनी वडिलोपार्जित शेती व्यवसाय निवडला. शेती करतानाच त्यांनी कविता करण्यास प्रारंभ केला. प्रचंड अभ्यास आणि वाचनामुळे त्यांच्या कविता अशी दर्जेदार होत गेल्या. आणि हळूहळू त्यांची रानकवी अशी ओळख झाली. त्यांची अनेक कविता, लोकगीते ही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अनेक कविता या चित्रपटांमध्ये गाण्याच्या स्वरुपात प्रसिद्ध झाल्या.
मित्र शरद पवार यांची श्रद्धांजली
माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मला अतिशय दुःख झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड खेड्यात गरीब शेतकरी कुटूंबात जन्मलेल्या ना. धों. चे बालपण कष्टात गेले पण कष्ट झेलताना त्यांचे संवेदनशील मन रानात रमले. तिथेच त्यांच्या सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ना.धो. च्या कवितांनी रानातल्या कविता, पावसाळी कवितांनी , जैत रे जैत सारख्या अनेक चित्रपट गीतांनी मराठी माणसांच्या मनावर गारूड केले. ना. धों ची विधान परिषदेतील भाषणे देखील माणसाच्या काळजाचा ठाव घेत. ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लाऊन जाणारा आहे. मी आणि माझ्या कुटूंबांतर्फे या मृदू मनाच्या निसर्ग कवीला श्रद्धांजली अर्पण करतो.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
“मातीत रमणारा, निसर्गाची अनेक रुपे आपल्या शब्दांतून उलगडून दाखवणारा संवेदनशील रानकवी हरपला आहे”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी, माजी आमदार ना. धों. महानोर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. महानोर यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची हानी झाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
Marathi Poet Na dho mahanor Passed away
literature jalgaon aurangabad palaskhed pune