इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोविड काळानंतर चित्रपटात जाऊन चित्रपट बघण्याचे प्रमाण फारच कमी झाले होते. आताही काही चित्रपटांचा अपवाद वगळता अन्य चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, या सगळ्याला छेद देत रितेश – जेनिलियाच्या ‘वेड’ने प्रेक्षकांना खरंच वेड लावले आहे. दुसऱ्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचं प्रेक्षक तसेच समीक्षकांकडूनही कौतुक झालं आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रितेश पत्नी जेनेलिया डिसूझासोबत मुख्य भूमिकेत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ४४.९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटानंतर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. तर प्रदर्शनाच्या तिसऱ्या शनिवारी ‘वेड’ने २.७२ कोटी रुपयांची कमाई केली.
रितेश-जिनिलियाशिवाय ‘वेड’ या चित्रपटात अभिनेता सलमान खानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्याने तर सगळ्यांनाच वेड लावलं आहे. दिग्दर्शनाच्या या पहिल्याच प्रयत्नात रितेशने दमदार पदार्पण केले आहे. तर जेनेलियाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.
रितेशचा ‘वेड’ हा चित्रपट २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मजिली’ या चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दोन वीकेंडला ३३.४२ कोटी रुपयांची कमाई झाली. हा तिसरा आठवडाही चित्रपटासाठी सकारात्मक आहे. १५ कोटी खर्चून हा चित्रपट तयार झाल्याची माहिती आहे. त्याच्या कितीतरी पट नफा आता ‘वेड’ला झाला आहे. यासोबतच तो बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रमही रचतोय.
‘वेड’ने याआधी ‘सैराट’ चित्रपटाचा एक विक्रम मोडला. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी रितेश-जिनिलियाच्या ‘वेड’ने ५.७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. कमाईच्या या आकड्यासह चित्रपटाने सुपरहिट ‘सैराट’चा विक्रम मोडला आहे. ‘वेड’ मध्ये रितेश आणि जेनिलियाशिवाय जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे आणि विनीत शर्मा यांच्याही भूमिका आहेत.
https://twitter.com/taran_adarsh/status/1614865380312506368?s=20&t=B05cKzLytmed2BkHnr-jiw
Marathi Movie Ved Record Break Collection