इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीत अलीकडे अनेक नवनवीन प्रयोग होत असतात. वेगळे विषय, सादरीकरणाची वेगळी धाटणी यामुळे असे चाकोरीच्या बाहेरचे चित्रपटही चांगले लोकप्रिय होत आहेत. नागराज मंजुळे यांच्या सैराट, फॅन्ड्री अशा चित्रपटानंतर गावरान चित्रपटांचा ट्रेंड येताना दिसतो आहे. मात्र, असे वेगळ्या प्रयोग राबवणाऱ्या मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी चित्रपट गृहच मिळत नसल्याचे प्रकार गेल्या काही काळात अनेकदा समोर आला आहे. यामुळे मराठी चित्रपट निर्माते तसेच प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे. अशाच प्रकाराला आता दिग्दर्शक म्हणून भाऊ कऱ्हाडे यांनाही सामोरे जावे लागले आहे. त्यांचा बहुचर्चित ‘टीडीएम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, प्रेक्षकांना आवडला देखील. मात्र, त्याला पुरेशा स्क्रीन मिळत नसल्याने अखेर कऱ्हाडे यांनी या चित्रपटाचे शो काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद
काही दिवसांपासून भाऊ आणि टीडीएम नावाचा चित्रपट चर्चेत आला आहे. टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या चित्रपटाचे वेध लागले होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र त्यानंतर या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा स्क्रीन न मिळाल्याने प्रेक्षकांची निराशा झाली. काही दिवसांपासून थिएटरमध्ये या चित्रपटाला स्क्रिन उपलब्ध नसल्याची खंत निर्माते आणि दिग्दर्शक भाऊ यांनी व्यक्त केली आहे.
फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केला निर्णय
या सगळ्या परिस्थितीला कंटाळून शेवटी भाऊ कऱ्हाडे यांनी चित्रपटाचे शो काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी प्रेक्षकांशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. येत्या काळात आपण टीडीएमचे शो मागे घेत असल्याचे प्रेक्षकांना सांगितले आहे. मेकर्सच्या वतीनं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रकही जारी करण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकात नेमके काय?
रसिक प्रेक्षकहो नमस्कार, मला माहिती आहे तुम्हाला ‘टीडीएम’ सिनेमा थिएटरमध्ये बघायची इच्छा आहे. पण सध्याची परिस्थिती बघता मी ‘टीडीएम’चे प्रदर्शन तूर्तास थांबवत आहे. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पुढील प्रदर्शनाचे अपडेट्स लवकरात लवकर देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तुम्ही करत असलेल्या सहकार्यासाठी सर्वांचे मन:पूर्वक आभार!
कलाकारही नाराज
टीडीएमला स्क्रीन न मिळाल्याने कलाकारांनी काही दिवसांपूर्वी थिएटरमध्येच रडत आपले गाऱ्हाणे मांडले होते. यामध्ये कलाकारांनी मराठी चित्रपटांवर कशाप्रकारे अन्याय होतो आहे, हे प्रेक्षकांना सांगितले होते. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील टीडीएमला पुरेशा स्क्रिन्स देण्यात याव्यात, असे ट्विट केले होते.
Marathi Movie TDM Director Big Announcement