इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाची अमेरिकेमध्येही क्रेझ असल्याचे दिसून येत आहे. खासकरुन महिला वर्गाचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. अमेरिकेत आतापर्यंत या चित्रपटाने ८२ लाखांपेक्षा अधिक कमाई केली आहे.
गेल्या अनेक वर्षांनंतर मराठी सिनेमाची मोठी क्रेझ दिसून येत आहे. महाराष्ट्रात आणि भारतातील अन्य राज्यांमध्येही बाईपण भारी देवा या चित्रपटाचे शो हाऊस फुल्ल होत आहेत. आता भारताहाबेरही या चित्रपटाने रसिकांना भुरळ घातली आहे. अमेरिकेतील विविध राज्यांमध्ये या सिनामाचे विशेष शो आयोजित केले जात आहेत. खासकरुन विशिष्ट प्रकारचा ड्रेसकोड आणि थीम निश्चित करुन महिला, तरुणी या चित्रपटासाठी थिएटर, मल्टीप्लेक्समध्ये येत आहेत. तसेच, यानिमित्ताने छोटे गेट टु गेदरही या महिलांचे होत आहे.
बाईपण भारी देवा या सिनेमाने अमेरिकेत १०० हजार डॉलर्सची कमाई केली आहे. ही रक्कम ८२ लाखांपेक्षा अधिक आहे. कोलोरॅडो मराठी मंडळासह अमेरिकेतील विविध मंडळांच्यावतीने विशेष शोचे आयोजन केले जात आहे.
‘बाईपण भारी देवा’ ३० जून रोजी रिलीज झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाने १ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर विकेंडला ३ दिवसांत ६ कोटी रुपये कमावत बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. बायकांचे आयुष्य अनुभवणे आणि तेच चित्रपटात जगणे याची संधी घेत या अभिनेत्रींनी हा चित्रपट चांगलाच गाजवला आहे. विशेष म्हणजे केवळ बायकाच नाही तर संपूर्ण कुटुंब पाहू शकतं, असा हा चित्रपट आहे. सिनेमात दाखवण्यात आलेल्या या बायकांची कहाणी प्रत्येकाला आपलीच कहाणी वाटत आहे. त्यामुळे थिएटरमध्ये महिलांची एकच गर्दी होत आहे. या चित्रपटाचे सर्व शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. हा चित्रपट चित्रपटगृहात दणदणीत कमाई करताना दिसत आहे. केदार शिंदे यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे.
काय आहे गोष्ट?
या सर्व सहाजणी ‘काकडे सिस्टर्स’ असून प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. सख्ख्या बहिणी असूनही स्पर्धेच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी सगळ्या एकत्र भेटतात. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. त्यांचे स्वतःचे आपापसातील काही लहानपणापासूनचे वाद आहेत. त्याचीही झलक यात दिसते. मंगळागौर स्पर्धेसाठी सहा बहिणी एकत्र येतात आणि पुढे काय धम्माल होते हे सिनेमात दाखवलं आहे. एकंदरच उत्तम पटकथा, कमाल दिग्दर्शन, गाणी आणि अफलातून अभिनय यामुळे सिनेमा सरळ मनाला भिडताना दिसतो.
केदार शिंदेंची पोस्ट काय?
‘माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य स्त्रियांच्या आशीर्वादाने हे यश मिळालंय. मला जन्म देणारी आई… सांभाळणारी आजी.. लक्ष ठेवणाऱ्या मावश्या… मला लग्नानंतर सांभाळून घेणारी माझी बायको.. आनंद देणारी माझी मुलगी.. माझ्या प्रत्येक कामात सहभागी असणारी माझी सहकारी, अभिनेत्री आणि माझ्या कामावर प्रेम करणारी स्त्री प्रेक्षक.. हे तुमचं यश आहे. या सिनेमातली प्रत्येक स्त्री जी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तिचं हे यश आहे. मी फक्त निमित्त मात्र!! ही स्वामीआई ची कृपा हा सिद्धिविनायकाचा महाप्रसाद…’ अशी पोस्ट केदार शिंदे यांनी केली आहे.