फाल्गुन महिना
फाल्गुन महिना हा हिंदू पंचांगाप्रमाणे मराठी महिन्यातील शेवटचा महिना असतो. या महिन्यात मुख्यतः भगवान शिव शंकर व कृष्ण पूजन यास विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्र व होळी हे दोन मोठे सण या महिन्यात येतात. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीला फाल्गुनी नक्षत्र असल्याने या महिन्याला फाल्गुन नाव पडले आहे. आरोग्य दृष्टीनेही या महिन्याला विशेष महत्त्व आहे. थंडीचा काळ जाऊन उन्हाच्या उष्णतेचा काळ या महिन्यात सुरू होतो. अशा रीतीने ऋतू परिवर्तनाचा काळ या महिन्यात येत असल्याने आरोग्य विषयक विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसा ताक, रसदार फळे यांचे सेवन तर रात्री दूध हलके अन्न घ्यावे. निसर्गसौंदर्याच्या दृष्टीने फाल्गुन महिना विशेष महत्वाचा आहे. हिवाळ्यातील झाडांची पानगळ संपून हिरवी कोवळी पालवी झाडांना येऊ लागली असल्याने हळू हळू निसर्ग हिरवा गार होऊ लागतो. अचानक होणाऱ्या ऋतू बदलामुळे वात-पित्त-कफ अशा तीनही प्रकृती असणाऱ्यांनी आहार-विहार विषयक विशेष काळजी घ्यावी. फाल्गुन महिन्याच्या उत्तरार्धात होणारे अल्हाददायक वातावरण आपणास वसंत ऋतूची चाहूल लागल्याची जाणीव देते. फाल्गुन महिन्यात चंद्र पूजनाला विशेष महत्त्व आहे. ज्यांच्या कुंडलीत चंद्र विशेष चांगल्या स्थितीत नाही त्यांनी फाल्गुन महिन्यात चंद्र पूजन करावे. तज्ज्ञांचा सल्ल्याने मोतीची अंगठी वापरावी.