नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विभागीय आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, महापालिका, सार्वजनिक वाचनालय आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कालिदास कलामंदीरमध्ये गझल संध्या या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अधिकारी रामचंद्र कुलकर्णी होते. येथील संतोष वाटपाडे यांनी या मैफलीची सुत्रे सांभाळलीत.
या कार्यक्रमामुळे नाशिककरांची सायंकाळ अविस्मरणी ठरली. गझलेच्या प्रत्येक शेरात धक्के देण्याची ताकद असते, आश्चर्यचकीत करण्याचे सामर्थ्य असते. क्या बात है असे शब्द आपसूकच ओठांतून बाहेर पडावेत, अशा एकाहून एक सरस गझला सादर झाल्या. जगणेच क्षणाचे होते पण तेच रणाचे होते…मन मोरपिसारी माझे अन घाव घणाचे होते या त्यांच्या ओळीही हृदयाला भिडणाऱ्या ठरल्या. कवयित्री अलका कुलकर्णी यांनी आपल्या गझलेतून फेऱ्यात भुतकाळाच्या पुरतीच अडकली होते ,जे राख विभूती झाले पुन्हा पेटले होते यांसारख्या ओळी सादर केल्या.
“काळीज आता कोणाचेही चरकत नाही
म्हणून मी या जखमा माझ्या मिरवत नाही”
“दिसली बाई मला आठवे माझी आई..
“मी चष्म्याची काच कधीही बदलत नाही..
यासारख्या गझलेच्या ओळी सादर करीत धुळे जिल्ह्यातून आलेल्या रावसाहेब कुंवर या गझलकाराने उपस्थितांची दाद मिळविली. महावितरणच्या सेवेतून निवृत्त झालेल्या राधाकृष्ण साळुंखे यांनी राजकारण, निवडणूका अन सामान्य मतदाराला गृहीत धरण्याच्या राजकारण्यांच्या वृत्तीवर गझलेतून ताशेरे ओढले. काळजी नको छदाम ज्याच्या खिशात नाही राजकारणाइतके करियर कशात नाही यासारख्या ओळी सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. गौरवकुमार आठवले, आकाश कंकाळ, संजय गोऱ्हाडे, हिरालाल बागुल यांनीही यावेळी आपल्या गझल सादर करून या गझल संध्येला वेगळ्या उंचीवर नेले.