सातारा – विदयार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडविणे व अशा नागरिकांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्य निर्माणाचे कार्य करून शिक्षक हा खऱ्या अर्थाने सृजनाचा साधक होऊ शकतो.अध्यापन प्रक्रियेत विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन विचार व्यक्त करण्यास प्रवृत होणे यातच भाषा शिक्षकाचे खरे कौशल्ये आहे. शिक्षक राष्ट्राचा शिल्पकार, समाजाचा आधारस्तंभ आहे. ज्या क्षमता आणि चैतन्य मुले आपल्याबरोबर घेऊन येतात त्यांना कोंब, अंकूर फ़ुटण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे म्हणजे शिकविणे. नवनवीन अनुभव, कौशल्ये, व माहिती घेण्यासाठी मुलांची मनं प्रवृत्त करणे, त्यांना प्रेरणा देणे, चालना देणे म्हणजेच शिकवणे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. तशीच जीवनाच्या सर्वांगाना स्पर्श करणारी सर्वस्पर्शी विचाधारा आहे. म्हणून मातृभाषा शिक्षक ही फक्त व्यक्ती नसून संस्काराचे एक विदयापीठ आहे.असे उद्गार कविवर्य लक्ष्मण महाडिक यांनी काढले.
सातारा येथील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलात २५व २६ डिसेम्बर दरम्यान दोन दिवसाच्या राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिर संपन्न झाले. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर ,उपशिक्षणाधिकारी खंदारे, हनुमंत कुबडे, प्रा.दशरथ सागरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.राज्यस्तरीय मराठी भाषा चिंतन शिबिराचे अध्यक्षस्थानी प्राचार्य कवी लक्ष्मण महाडिक उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात कविवर्य लक्ष्मण महाडिक पुढे म्हणाले की,मातृभाषा शिक्षक हा नेहमीच चैतन्यदायी असतो.आणि चैतन्यदायी माणूसच समाजात खऱ्या अर्थाने विरघळतो. जो विरघळतो तोच सर्वत्र दरवळतो. कारण तो सत्य, शीव आणि सौंदर्याचा पुजारी असतो. शिक्षक हा मानवी मन आणि मानवी संस्कृतीतला एकमेव दुवा आहे. शस्त्रांनी अथवा शास्त्रांनी संस्कृतीचे संवर्धन होत नाही.तर ते केवळ जिवंत मनाच्या शिक्षकांमुळे होते.म्हणून मराठी भाषेचा शिक्षक हा नेहमी चालता बोलता ज्ञानकोश बनला पाहिजे.आपल्याला आपले म्हणून काही सत्त्व आणि स्वत्त्व टिकवायचे असेल, तर मराठी भाषा तसेच तिच्या सर्व बोलींची जोपासना, संवर्धन करावेच लागेल. जेव्हा एका बोलीचा किंवा भाषेचा अंत होतो, म्हणजे एका भाषिक दुनियेचा अंत होतो. तेव्हा समाज, संस्कृती आणि इतिहासाचाही अंत होतो. भाषिक वारसा नष्ट होतो.प्रत्येक भाषा ही दळणवळणाचे माध्यम असणारी सामाजिक संस्था मानली जाते.मराठी भाषा शिक्षकांनी या बालमनाला नवीदृष्टी व त्यांच्या बंदिस्त दप्तराला प्रकाशाची दारं लावली पाहिजे. त्याचबरोबर मुलांच्या बंदिस्त मनाला स्वैर भरारी मारण्यासाठी एक विश्वासाचं मुक्त आकाश दिलं पाहिजे.विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या वाटा स्वतः शोधण्यास भाषा शिक्षकाने प्रोत्साहन दिले पाहिजे.भाषेबद्दल बोलताना प्राचार्य महाडिक म्हणाले,की भाषा ही मानवाची विशेष निर्मिती आहे. मानवी व्यवहाराचे ते एक प्रभावी माध्यम आहे. तसेच ते एक ज्ञान संपादनाचे व अभिव्यक्तीचे प्रभावी साधन आहे.मातृभाषा हे तुमच्या माझ्या जगण्याचे सशक्त माध्यम आहे. भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नसून ते संस्कृती आणि अस्मितेचं प्रतिक आहे. आपली मराठी ही केवळ आपली राजभाषा नाही; तर ते आपलं सांस्कृतिक वैभव आहे. म्हणूनच मराठीचा विकास ही मराठी माणसांची सामुहिक जबाबदारी आहे. मानवी जीवनात मातृभाषेचे स्थान अनन्यसाधारण आहे. भाषा जीवनाचा प्राणवायू आहे. भाषा हे संदेशवहन करण्याचे प्रभावी साधन आहे. मानवनिर्मित ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेतांची योग्य मांडणी करून विनिमय साधणारी सामाजिक संस्था म्हणजे भाषा होय .मराठी भाषेविषयी निष्ठा व आत्मश्रध्दा पुढील पिढ्यांमध्ये कशा वाढतील, यासाठी आपण सारेच प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचा पक्का निर्धार करूया.असे आवाहन कविवर्य लक्ष्मण महाडिक यांनी महाराष्ट्रातील मराठी भाषा शिक्षकांना केले.
दोनदिवसाच्या चिंतन शिबिरात अनेक वक्त्यांनी उपस्थिती लावली.शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी मराठी राज्यस्तरीय भाषा चिंतन शिबिराचे आयोजनाबद्दल आयोजकांचे अभिनंदन करून आज खरोखरच चिंतनाची गरज असल्याचे सांगितले. निवृत्त शिक्षण संचालक मकरंद गोंधळी यांनी कथाकथनातील वाचिक अभिनय तंत्र व मंत्र यावर मार्गदर्शन केले.प्रा.अनिल पाटील यांनी मराठी भाषा सक्तीचा अधिनियम सद्यस्थितीवर विचार मांडले.इंद्रजीत देशमुख यांनी ज्ञानदेवांच्या पसायदानाचा सामाजिक दृष्टीकोनातून अर्थ अत्यंत मार्मिक भाषेत विशद केला.सायंकाळी कवी प्रा.प्रदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले त्यात कवी वसंत पाटील, मनीषा पाटील,लक्ष्मण महाडिक व इतर कवींनी सहभाग नोंदविला. प्रा.वैजन्नाथ महाजन यांनी मराठी भाषेचे सौष्ठव विशद केले.तर पुण्याचे माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आपल्या प्रकट मुलाखतीतून मराठी भाषा शिक्षकांचे समाजाच्या विकासातील योगदान अधोरेखित केले. अंभेरीच्या शिवधामचे आचार्य शिवानंदजी महाराज यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जासंदर्भात विचार मांडले.नवीन शैक्षणिक धोरण २०२० यावर डॉ.सुफिया शिकालगार यांनी विचार मांडले .
मायमराठीचे विश्वस्त हनुमंत कुबडे यांनी मायमराठी राज्य अध्यापक संघाची वाटचाल आणि भविष्यातील विविध उपक्रमांच्याबद्दल माहिती सांगितली. शिक्षण संचालक दिनकरराव पाटील यांनी वाचन चळवळवळीचे महत्व सांगितले.तर समारोपाच्या कार्यक्रमात प्राचार्य यशवंत पाटणे यांनी मराठी भाषा साहित्य एक सांस्कृतीक अनुबंध या विषयावर विवेचन केले.हे चिंतन शिबीर यशस्वी करण्यासाठीराज्य संघाचे सचिव प्राचार्य अनिल बोधे व सातारा जिल्हा माय मराठीच्या शिक्षक बंधू भगिनींनी मोठे योगदान दिल्याबद्दल राज्य अध्यापक संघाच्या वतीने सर्वांचा गौरव यावेळी अध्यक्ष प्राचार्य लक्ष्मण महाडिक व विश्वस्त हनुमंत कवडे यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबिरासाठी संघाचे कार्याध्यक्ष द्वारकानाथ जोशी,उपाध्यक्ष अशोकराव तकटे, जगन्नाथ तथा नानासाहेब शिवले,विलासराव पाटील,रमाकांत देशपांडे, जिजाबा हासे,सहसचिव सुनिता पाटील,खजिनदार ज्ञानदेव दहिफळे,राज्य संघटक सारंग पाटील व सौ.जयाश्री गीते यांचे भरीव सहकार्य लाभले. चिंतन शिबिराच्या आयोजनातील सातारा जिल्ह्यातील सर्व सहकारी,यजमान संस्थेचे सर्व पदाधिकारी,शिक्षक ,सेवकवर्ग, तसेच विविध दैनिकांचे,दूरदर्शन वाहिन्यांचे पत्रकार,प्रतिनिधी यांचे माय मराठी राज्य अध्यापक संघाच्या वतीने अशोकराव तकटे यांनी आभार मानले