मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे. जवाहर बालभवन चर्नी रोड येथे होत असलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र दक्षिण मुंबई परिसरात आणि उपकेंद्र ऐरोली, नवी मुंबई येथे बांधण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे.
मराठी भाषा भवन मुख्य केंद्र उभारणीकरिता गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंड विनामोबदला मराठी भाषा विभागास देण्याचा निर्णय झाला आहे. सुमारे 2100 चौ.मी. क्षेत्र मराठी भाषा भवनास मिळणार आहे. अंदाजे 126 कोटी रुपये एवढा खर्च मराठी भाषा भवन उभारणीसाठी लागणार आहे. मुंबईच्या मे. पी.के. दास ॲण्ड असोसिएट्स यांची वास्तू विशारद म्हणून निवड करण्यात आली आहे.
कसे असेल मराठी भाषा भवन?
– मराठी भाषेचा विकास आणि संवर्धन करण्यासाठी मरीन ड्राईव्ह येथील प्रस्तावित मराठी भाषा भवन चर्नी रोडला समुद्र किनारी उभे राहणार आहे. प्रकल्पाची जागा चर्नी रोड येथील समुद्राभिमुख भूखंडावर असेल.
– हे स्थळ मरीन ड्राइव्हच्या समोर आहे आणि पश्चिमेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद आणि पूर्वेला सावित्रीदेवी फुले महिला – वसतिगृहाने वेढलेले आहे. जागेची लांबी अंदाजे 54 मीटर आणि रुंदी सरासरी 32 मीटर असेल.
– मराठी भाषा भवन हे (G+7) तळमजला अधिक सात मजल्याचे असून त्यात तळघर देखील असेल. त्याची लांबी 39 मीटर आणि रुंदी सुमारे 22 मीटर असेल.
– संकल्पनेनुसार पहिल्या मजल्यावर एक खुले सार्वजनिक मंच असेल. इथे मरीन ड्राईव्हच्या लोकांना थेट प्रवेश करता येईल. मरीन ड्राईव्हपासून या मंचापर्यंत पायऱ्यांची मालिका जाईल.
– इमारतीचे दुसरे प्रवेशद्वार उत्तरेकडील मोकळ्या जागेतून दिलेले आहे जेथून जिना आणि लिफ्टमध्ये प्रवेश करणे शक्य आहे.
– इमारतीमध्ये 200 आसन क्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, 145 क्षमतेचे अॅम्फी थिएटर, चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा आणि एक मजला प्रशासकीय आणि कार्यालयीन जागा असेल.
– चार मजल्यांच्या प्रदर्शन दर्शिकेला चार विभागांमध्ये वर्गीकृत केले आहे. मराठी भाषेचा इतिहास आणि तिच्या उत्क्रांतीचा प्रवास इथे बघता येणार आहे.
– या दर्शिकेतील प्रदर्शनात विशेष तयार केलेले चलचित्रपट, त्रिमितीय प्रतिमा (होलोग्राम्स) आणि छायाचित्रांच्या प्रती असतील.
– अंदाजे 50 फूट / 35 फूट महाराष्ट्राचा नकाशा लक्ष वेधून घेणारा ठरेल.
– हा नकाशा भाषेच्या उत्क्रांतीत योगदान देणाऱ्या सर्व प्रतिष्ठित विजेते आणि व्यक्तिमत्त्वांच्या स्थानांचे चित्रण करेल.
– हा नकाशा अभ्यागतांकडून त्यांच्या मूळ स्थानासह प्रत्येक वैयक्तिक संकेतस्थळ आणि व्यक्तिमत्त्वाचा सखोल अभ्यास करण्यासाठी डिजिटल पद्धतीने वापरता येईल.
– दर्शिकेच्या 4 मजल्यापैकी 3 मजले तांब्याच्या धातुपासून तयार केलेल्या जाळीने वेढलेले असणार आहे. यासाठी खास मराठी लिपीच्या अक्षरांच्या रचनेतून ही जाळी तयार करण्यात येणार आहे.
– इमारतीमध्ये 200 क्षमतेचे सभागृह आहे आणि ते तळघरात बांधलेल्या भागात असेल.
– इमारतीच्या मागील बाजूस बहुमजली वाहनतळ प्रस्तावित आहे.
– प्रकल्पाचे एकूण बांधकाम क्षेत्र अंदाजे ६५८३ चौ.मी. (७०,८५८ चौ. फूट) एवढे असेल.