नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वामिराज प्रकाशन या संस्थेमार्फत दर महिन्याच्या २७ तारखेला मराठी आठव दिवस हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत शनिवार, २७ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री नऊ वाजता कालिदास कलामंदिरात ‘ गंध स्वरांचा ‘ हा मराठी आठवणीतील मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून प्रवेशिका गुरुवार, दि. २५ ऑगस्टपासून कालिदास कलामंदिरात मिळणार आहेत. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य राहील.
मराठी आठव दिवस या उपक्रमांतर्गत आतापर्यंत कोल्हापूर, कणकवली, गोवा, मुंबई आणि पुणे येथे कार्यक्रम सादर केले आहेत. या महिन्याचा मराठी आठव दिवस नाशिकमध्ये साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे हा हेतू तर आहेच, हा उपक्रम २७ तारखेला करताना कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचेही स्मरण नित्य असावे असा हेतू असतो.
नाशिकमधील कार्यक्रमाचे आयोजन सत्कार्य फाउंडेशन यांनी केले असून, पोलिस उपायुक्त रुपाली अंबूरे आणि सुप्रसिद्ध गायक अतुल बेले काही गाजलेली मराठी गाणी सादर करणार आहेत. या संगीत रजनीला नाशिककर बहुसंख्येने उपस्थित राहतील आणि मराठी आठव दिवस साजरा करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
शिर्डी येथेही मराठी आठव दिवस
शनिवार, २७ ऑगस्ट रोजी शिर्डी येथेही मराठी आठव दिवस साजरा होणार आहे. स्वरांग प्रस्तुत ‘ माय बोली साजिरी ‘ हा मराठीची श्रीमंती दाखवणारा अभिवाचानात्मक कार्यक्रम यावेळी सादर होईल. साई पालखी निवारा येथे दुपारी ३ ते ५ या वेळेत हा कार्यक्रम होईल. हा कार्यक्रमसुद्धा रसिकांसाठी विनामूल्य असून वसंतदादा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने आयोजित केला आहे. या दोन्ही कार्यक्रमांना रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे आणि मराठी आठव दिवस या उपक्रमाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन स्वामीराज प्रकाशनच्या संचालिका रजनी राणे यांनी केले आहे.