इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – १९८७ मध्ये मराठी चित्रपटविश्वात पदार्पण केलेल्या वर्ष उसगांवकर यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीवर राज्य केले. ‘गंमत – जंमत’, ‘हमाल दे धमाल’, ‘सवत माझी लाडकी’, या मराठी चित्रपटासोबत त्यांनी हिंदी चित्रपटात देखील काम केले होते. ही सदाबहार अभिनेत्री मध्यंतरीच्या काळात मोठ्या पडद्यापासून लांब गेली होती. त्यानंतर काही मालिकांमधून त्यांनी पुन्हा पदार्पण केले. यामुळे त्यांचे चाहते भलतेच खुश झाले. तरीही अचानक मोठ्या पडद्यापासून लांब जाण्यासारखे काय कारण घडले, या बाबतीत सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता होती. या गोष्टीचा खुलासा वर्ष उसगांवकर यांनी नुकताच केला आहे.
नुकत्याच एका मुलाखतीवेळी वर्षा उसगांवकर यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं. त्या म्हणाल्या, “चित्रपटात काम करण्याची माझी खूप इच्छा होती. पण दमदार भूमिकांसाठी मला विचारणा झाली नाही. एक – दोन दिवसाची, दहा दिवसाची अशा भूमिकांची मला ऑफर येत होती. नंतर त्यांनी त्यांना गेल्या काही वर्षात आलेले निर्माता – दिग्दर्शकांचे अनुभवही सांगितले. त्या म्हणाल्या, “एक निर्माता माझ्याकडे एका चित्रपटाची कथा ऐकवायला आला. त्याने कथा ऐकवायला सुरुवात केली. तो म्हणाला, “तुम्ही हिरोच्या आई असता…तुम्ही अमेरिकेहून येता” आणि पुढे तो कथा विसरला. मला आश्चर्य वाटलं. मी अमेरिकेहून भारतात येऊन काय करते, हेच जर दिग्दर्शक विसरत तर मी अशी भूमिका का करायची? काम करण्याच्या समाधानाबरोबरच पैसे मिळवणंही महत्त्वाचं असलं तरी पैशांसाठी मी चित्रपटांच्या कथेच्या बाबतीत तडजोड करणार नाही,” असे त्या ठणकावून सांगतात.
दरम्यानच्या काळात त्यांनी जे मराठी चित्रपट केले ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाहीत. मराठीबरोबरच त्यांनी काही कोकणी चित्रपट केले, जे मला समाधान देऊन गेले. वर्षा उसगांवकर जवळजवळ ८ वर्षे मराठी चित्रपटांपासून दूर होत्या. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शेर शिवराज’ चित्रपटापासून मोठ्या पडद्यावर नवी इनिंग सुरू केली. नुकताच त्यांचा ‘हवाहवाई’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्या या चित्रपटात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
— Varsha Usgaonker (@VarshaUsgaonker) October 14, 2022
Marathi Actress Varsha Usgaonkar on Film Industry
Entertainment