इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सो कुल अर्थात सोनाली कुलकर्णी ही एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या कामात तसेच कामाच्या निवडीतही तिचा हा संवेदनशीलपणा दिसतो. यामुळेच तिचा कोणताही चित्रपट, मालिका हिट होते. याशिवाय ती कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपली मते मांडत असते. सध्या सोनाली तिच्या अशाच एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. या वक्तव्यानंतर तिने पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोनाली ही भारतातील मुली आणि मुलांबाबत बोलते आहे. ‘भारतातील काही मुली या आळशी आहेत’ असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. सोनालीनं आता याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिने आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.
‘मला मिळत असलेल्या प्रतिसादाने मी भारावून गेले आहे. माझ्याशी जोडल्या गेलेल्या सर्वांचे, विशेषत: संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे मी आभार मानू इच्छिते. मी स्वतः एक स्त्री आहे. मला त्यांच्या सगळ्या अडचणींची कल्पना आहे. माझी मतं मांडताना इतर महिलांना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. कौतुक करण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचल्याबद्दल मी तुम्हा सर्वांची आभारी आहे. आपण विचारांची अधिक मुक्तपणे देवाणघेवाण करू शकू, अशी आशा मला वाटते, असेही ती म्हणते.
माझ्या वक्तव्यामुळे नकळतपणे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मनापासून माफी मागते. मला खळबळजनक घटनांचे केंद्र बनायचे नाही. मी एक आशावादी व्यक्ती आहे. जीवन सुंदर आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे.’ असाही सोनालीने पोस्टमध्ये लिहिलं.
सोनालीचं वक्तव्य
सोनालीच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती म्हणते, “भारतातील बऱ्याच मुली आळशी आहेत. त्यांना असा बॉयफ्रेंड पाहिजे किंवा असा पती हवा आहे की, ज्याच्याकडे चांगली नोकरी असेल, ज्याच्याकडे घर हवं. पण त्या मुलीमध्ये एवढी हिंमत नाही की, ती म्हणेल जेव्हा तू माझ्यासोबत लग्न करशील तेव्हा मी देखील निम्मी जबाबदारी सांभाळेन”.
— sonalikulkarni (@sonalikulkarni) March 18, 2023
Marathi Actress Sonali Kulkarni Apologies after Troll