इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने मराठी मनोरंजन विश्वामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. उत्तम अभिनेता असण्यासोबतच संकर्षण एक संवेदनशील लेखक आणि कवी म्हणूनही ओळखला जातो. त्यानं लिहिलेल्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अभिनय, लेखन याबरोबरच संकर्षण सोशल मीडियावरदेखील सक्रीय असतो. त्याच्या खासगी आयुष्याबरोबरच कधी त्याच्या कवितादेखील तो शेअर करत असतो.
नुकतीच संकर्षणने सोशल मीडियावर एक वेगळीच आणि उत्सुकता वाढवणारी पोस्ट शेअर केली आहे. संकर्षणने सोशल मीडियावर एका ताटाचा फोटो पोस्ट केलाय. या ताटात वरण भात, काकडी, भरलं टोमॅटो, वांग्याचं भरीत असं साधंसुधं रुचकर जेवण दिसतंय. संकर्षण गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. तो नेहमीच फिट आणि आनंदी असतो. संकर्षणच्या चेहऱ्यावर कायम एक प्रसन्नता असते. यामागचं रहस्यच बहुधा संकर्षणने या पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर उलगडलं आहे. संकर्षण सध्या तो ‘आम्ही सारे खवय्ये’ या शोचं सूत्रसंचालन करत आहे.
तर संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत आपण दररोज सकाळी ८:३० वाजता जेवत असल्याचा खुलासा संकर्षणने केला आहे. या पोस्टमध्ये संकर्षण म्हणतो…”मी तुम्हाला आज एक गंमत सांगतो…वयाच्या ७ व्या वर्षापासून आजपर्यंत मी रोज सकाळी ८ः३० ला जेवतो, तेही पोटभरून. माझे बाबा बॅंकेत होते. आता रिटायर्ड झाले. ते बरोबर ८.४०ला घरातून निघायचे..कधीच त्यांची वेळ चुकली नाही आणि ८.३०ला पान वाढायची माझ्या आईची वेळ कधी चुकली नाही.
आजही शूट असेल, नसेल…सकाळी लवकर जायचं असेल – नसेल…मला सकाळी ८.३० वाजले की पोटभर भूक लागते…आणि मी पोटभर जेवतोच…
आज आईने साधं वरण भात, हिरव्या टोमॅटोची भरलेली भाजी, वांग्याचं भरीत वाढलं. अहो, काय सांगू कसं वाटलं…मनसोक्तं हानलं बघा…माझ्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं..” सहज शेअर करावं वाटलं असं म्हणत त्याने चाहत्यांशी संवाद साधला आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
संकर्षणनं ही पोस्ट शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेन्ट सुरू केल्या आहेत. यामध्ये पहिली कॉमेन्ट अभिनेत्री सुकन्या मोने यांनी केली. त्यांनी लिहिलं की, ‘तो योग माझ्या आयुष्यात कधी येणार आहे कोणास ठाऊक…’ संकर्षणच्या अनेक चाहत्यांनी त्याची ही पोस्ट वाचून त्याचं कौतुक केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलं की, ‘दादा, तुझा हा साधेपणाच तुला इतर कलाकारांपेक्षा वेगळं बनवतो.’ तर आणखी एकानं लिहिलं, ‘ व्वा फारच छान, हे आहे पूर्णान्न!’, तर एका नेटकऱ्यानं लिहिलं, ‘तुझी शेवटची ओळ खरी आहे. आपल्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं.’ अशा प्रकारच्या विविध कमेन्ट नेटकऱ्यांनी संकर्षणच्या पोस्टवर केल्या.
Marathi Actress Sankarshan Karhade Diet Plan Health