इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधतीच्या मैत्रिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री राधिका देशपांडे ही सोशल मिडीयावरही चांगलीच सक्रिय असते. राधिका ही सध्या ‘सियावर रामचंद्र की जय’ या बालमहानाट्य प्रयोगात व्यस्त आहे. या शिबिरासाठी शासनाचा हॉल सवलतीच्या दरात मिळावा, यासाठी राधिका अनेक दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत होती. पण सरकारी काम, सहा महिने थांब, या म्हणीचा तिला चांगलाच अनुभव आला. अखेर तिला शासनाचा हॉल मिळाला असून त्याबद्दल तिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आहेत. याबद्दल तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने या पोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये काही बालकलाकार आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील दिसत आहेत. शिवाय इतर काही नेतेमंडळींनीही उपस्थिती दर्शवली होती. अभिनेत्रीने केलेले मुख्यमंत्र्यांचे कौतुक चर्चेत आले आहे.
अभिनेत्री राधिका देशपांडे टीव्ही विश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. नुकतीच तिने शासनाचा हॉल सवलतीच्या दरामध्ये मिळत नसल्याने पोस्ट करत सरकारी यंत्रणांच्या शिथिल कारभारावर संताप व्यक्त केला होता. याच पोस्टचा उत्तरार्ध म्हणून राधिकाने पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या लेटेस्ट पोस्टचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. ‘सियावर रामचंद्र की जय’ या बाल-महानाट्यसाठी सध्या राधिका काम करते आहे. ज्यासाठी तिला हॉलची गरज होती. अखेर तिला हॉल मिळाला असून यशस्वीपणे तिचं शिबिर पार पडलं, यामुळे अभिनेत्रीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले आणि त्यांचे कौतुकही केले आहे. राधिकाने या शिबिरादरम्यानचा फोटो शेअर करत लांबलचक पोस्टही शेअर केली आहे.
‘चार कागद, दोन सह्या, एक शिक्का’
‘चार हात, दोन फोन, एक नाथ’, असा मथळा देत अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली. राधिका म्हणाली की, ‘सियावर रामचंद्र की जय’. १८ एप्रिलला मी एक पोस्ट केली होती. त्या व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टचा हा उत्तरार्ध. राधिका म्हणते, यापूर्वीच्या पोस्टमध्ये मी हॉल उपलब्ध न होण्यावर टीका केली होती. माझी मुलं आणि मी नाटक करणार, हॉल मिळणार, दणदणीत प्रयोग आम्ही करणार, पण माझ्यासकट बाल कलाकारांसाठी ज्यांनी हॉल उपलब्ध करून दिला नाही, त्रास नाही तर छळ केला त्यांना हे उद्याचे नागरिक धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असे म्हटले होते. आता तसेच काहीसे घडले आहे.
https://twitter.com/radhikaonstage/status/1658490480135639041?s=20
‘देश बदल रहा है, तरक्की सुनिश्चित है’
बालनाट्य शिबिरासाठी मी हॉल शोधत होते. सरकारवर नव्हे तर सरकारी कामगार वर्गाच्या काम करण्याच्या पद्धतीवर नाराज होते. कामात कामचोरी, हलगर्जीपणा, बेशिस्त वागणं आणि उद्धट बोलणं खपवून घेणं मला जमलं नाही, जमत नाही. माझ्यावर अन्याय होतो आहे, माझ्या कामात अडथळा आणला जातो आहे हे लक्षात येता मी आवाज उठवला आणि सरकारकडून त्वरित कारवाई सुरू झाली.’
मुख्यमंत्र्यांचे आभार पुढील पोस्टमध्ये मानत असताना तिने लिहिले की, ‘चार हात कामाला लागले, मला दोन फोन आले आणि सांगण्यात आलं की कसलीही काळजी करू नका, तुमचं काम होईल. वरिष्ठांनी दखल घेतली आहे. एकनाथजी शिंदे साहेब मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता. पण तुम्हाला आशेनं टॅग करत पोस्ट टाकली. मला वाटलं माझी हाक पोहोचणार नाही कदाचित पण आर्ततेने मारलेली हाक तुमच्या पर्यंत पोहोचली. यंत्रणा हलली. आम्हाला हॉल मिळाला, आम्ही नाटक सादर केलं. एक प्रभु श्रीराम आमच्या पाठीशी आहेत पण तुम्ही त्याचे दूत बनून आमचा मार्ग मोकळा करून दिलात. लहान मुलांसमोर एक उदाहरण ठरलात. आता मुलं ही म्हणायला लागली आहेत. ‘एक नाथ कसा असावा तर असा!’ धन्यवाद.’
Marathi Actress Radhika Deshpande Thanks to Eknath Shinde