इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यापासून अभिनयाची सुरुवात करणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री, डान्सर, निवेदिका प्राजक्ता माळी हिचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. तिचं व्यावसायिक आयुष्य असेल किंवा वैयक्तिक आयुष्य ती सतत प्रकाशझोतात असते.
नुकतच तिने ‘प्राजक्तराज’ हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. या सगळ्या व्यस्ततेत तिला प्रेम करायला वेळच मिळाला नसेल असं अनेकांना वाटतं. मात्र ‘वाय’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिचे ब्रेकअप झाल्याचे तिनेच एका मुलाखतीत सांगितली होती. त्यामुळे आता प्राजक्तासाठी नेमकं काय महत्त्वाचं आहे, प्रेम की करिअर? प्राजक्तानेच त्याचं उत्तर दिलं आहे.
प्राजक्ताला नुकताच ‘झी युवा सन्मान’मध्ये झी युवा तेजस्वी चेहरा म्ह्णून गौरवण्यात आलं. त्यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, ‘प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. सगळ्यात शक्तिशाली गोष्ट आहे. प्रेमाने मोठ्यातला मोठा डोंगरही हलवता येतो. असे असले तरी आता आपण अवतीभवती प्रेम बघतो ते मला फार उथळ वाटतं. पैशांसाठी तडजोड केलेलं हे प्रेम वाटतं. कधी भविष्याचा विचार करून, कधी रडायला खांदा पाहिजे, समाजाला दाखवायला पाहिजे म्हणून प्रेम हवं, अशा पातळीवर प्रेम आलं आहे असं मला कधीतरी वाटतं. तरीही माझा प्रेमावर विश्वास आहे. खरं प्रेम आजही आहे. त्यामुळे करियर आणि प्रेम यामध्ये निवड करणं अवघड आहे. कारण मी जे करतेय ते फक्त करिअर नाहीये माझ्यासाठी. ती माझी जीवन पद्धती आहे.’ प्रेम की करिअर यात काय निवडायचे यावर ती म्हणते, करिअरची माझी व्याख्या वेगळी आहे. सतत काहीतरी करत राहणं ही माझी गरज आहे त्यामुळे नक्कीच मी करिअर निवडेन.’ प्राजक्ताचे हे विचार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
प्राजक्ता आणि प्रेम हे एक वेगळच समीकरण आहे. मध्यंतरीही तिने तिच्या गुरूंना लग्न करावं की नाही याबाबत विचारलं होतं. तेव्हाही ती चर्चेत आली होती. आता तिने थेट प्रेमावर भाष्य केले आहे. प्राजक्ताने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘पांडू’, ‘पावनखिंड’, ‘लकडाउन’, ‘वाय’ या चित्रपटांपर्यंत येऊन थांबला आहे.
Marathi Actress Prajakta Mali on Break up and Love