इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक गुणी अभिनेत्री आहेत. पल्लवी पाटील ही त्यातीलच एक. नुकतीच पल्लवी तिच्या एक फोटोमुळे चर्चेत आली आहे. पल्लवीने अल्पावधीतच कलाविश्वात तिची स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. नुकताच तिला एक बॉलिवूड चित्रपटही मिळाला आहे. इतर कलाकारांप्रमाणे पल्लवी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.तिचे फोटोज, व्हिडीओ तसेच कामाबद्दलही माहिती शेअर करत ती चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात राहते. पल्लवीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. रिक्षात बसल्याचा तिचा हा फोटो असून यावर तिने पोस्टही लिहिली आहे. तुम्ही म्हणाल यात काय विशेष, रिक्षात तर सगळेच बसतात. पण, पल्लवी रिक्षा चालकाच्या बाजूला बसून हा प्रवास केला आहे. तिच्या या फोटोने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
“मला नेहमीच रिक्षा चालकाच्या बाजूला बसून प्रवास करायचा होता. त्यांच्या घरी कोण कोण असतं पासून त्यांना खरंच मज्जा येते का हे काम करताना असे अनेक प्रश्न होते मला. मुली कधीच बाजूला बसू शकत नाही. कधी पाहिलंही नव्हतं. आपली चौकट नकळत आपण निर्माण करतो. माझी चौकट मी मोडली ह्याचा खूप आनंद झाला आणि समाधान देऊन गेलं. तुम्ही पण करून पाहा… मज्जा येते” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. पल्लवीची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत कमेंट केल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी काही जणांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाले आहे आणि याबाबत तिने समाजात चुकीचा संदेश दिल्याचे म्हटले आहे.
Marathi Actress Pallavi Patil Auto Driver Journey