इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रेल्वे, बसने जायचं नसेल तर अलीकडे ओला, उबेरच्या माध्यमातून रिक्षा किंवा गाडी बुक करणं हे काही फार नवीन राहिलेलं नाही. उलट लांबच्या प्रवासासाठी किंवा जवळच्या आरामदायी प्रवासासाठी यालाच प्राधान्य दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसात या गाड्यांच्या ड्रायव्हरने प्रवाशांना त्रास दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नुकताच अभिनेत्री मनवा नाईक हिला असाच अनुभव आला.
अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी म्हणून मनवा नाईक हिची ओळख आहे. आतापर्यंत तिने अनेक आघाडीच्या चित्रपटात काम केले आहे. फक्त अभिनेत्री म्हणून नव्हे तर एक यशस्वी निर्माती म्हणूनही तिला ओळखले जाते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटातही ती झळकली होती. यात तिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची म्हणजेच सोयराबाई ही भूमिका साकारली होती. नुकताच तिला आलेला अनुभव तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना शेअर केला आहे. उबेर चालकाचा आलेला वाईट अनुभव मनवाने तिच्या अधिकृत फेसबुकवर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने एका गाडीचा नंबर आणि त्या वाहन चालकाचा फोटो शेअर केला आहे. याबरोबर तिने तिच्याबरोबर घडलेल्या धक्कादायक प्रसंगाबद्दल सांगितले आहे.
I took uber at 8.15pm. the uber driver started talking on phone. At BKC signal he jumped the signal.He started arguing. I intervened. He got angry. Said..' Tu bharegi kyaa 500 rupe'? The uber driver started threatening me..@mybmc @CMOMaharashtra @PMOIndia @MumbaiPolice
— Manava Arun Naik (@Manavanaik) October 15, 2022
मनवा नाईकची संपूर्ण पोस्ट अशी
हा प्रसंग शेअर करायलाच हवा. रात्री ८.१५ च्या मी सुमारास उबर केली. वांद्रे-कुर्ला संकुलात पोहोचल्यावर तो उबेर चालक हा फोनवर बोलत होता. मी त्याला फोनवर बोलू नका असे सांगितले. त्यानंतर त्याने बीकेसीमधील एक सिग्नल तोडला. मी त्याला असं करू नका, असं पुन्हा एकदा सांगितलं. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही. यानंतर पुढे गेल्यावर वाहतूक पोलिसांनी त्याला अडवले. त्याचा फोटो क्लिक केला. पण त्या उबर चालकाने वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मी यात हस्तक्षेप केला. मी गाडीचा फोटो काढला आहे, त्यामुळे आता जाऊ द्या, असे मी पोलिसांना सांगितले. पण मी असं सांगितल्यानंतर त्या उबर चालकाला भयंकर राग आला. त्याने तू ५०० रुपये भरणार आहेस का? असं मला चढलेल्या आवाजात विचारले. तू फोनवर बोलत होतास, असं मी त्याला सांगितलं. त्यानंतर त्याने पुन्हा गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि यावेळी त्याने मला धमक्या दिल्या. ‘थांब तुला दाखवतो’, अशा शब्दात त्याने मला धमकावले.
https://www.facebook.com/justmanava/posts/10161962864777437
मी त्याला गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्या असे सांगितले. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात खूप अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी पुन्हा गाडी पोलीस स्टेशनला घ्या, असे त्याला सांगत होते. तो संपूर्ण प्रवासात माझ्याशी वाद घालत होता आणि गाडीही भरधाव वेगाने चालवत होता. वांद्रे कुर्ला संकुलाच्या परिसरात असलेल्या कुर्ला पुलावर त्याने पुन्हा एकदा गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. थांब दाखवतोच आता, अशी धमकीही त्याने मला दिली. त्यानंतर मात्र मी उबर सेफ्टीला फोन केला. उबरमधील ग्राहक सेवा कर्मचाऱ्याबरोबर फोनवर बोलत असतानाही तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. हा सर्व प्रकार सुरु असताना गाडी चुनाभट्टी रोडवरील प्रियदर्शनी पार्कपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी मी त्या चालकाला गाडी थांबव, असे सांगितले. पण त्याने माझे काहीही ऐकले नाही. त्यावेळी त्याने कोणाला तरी फोन केला.
त्यानंतर मात्र मी जोरजोरात हाका मारू लागले. ओरडायला लागले. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने मला त्या गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. त्यांनी त्या गाडीतून मला बाहेर काढले. मी सध्या सुरक्षित आहे. पण नक्कीच या सर्व प्रसंगामुळे माझी घाबरगुंडी उडाली आहे, असे मनवा नाईक म्हणाली.
दरम्यान, मनवा नाईकच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेते सुनील तावडे यांनीही तिची ही पोस्ट रिशेअर केली आहे. तसेच तिने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांसह, महापालिकेलाही टॅग केले आहे.
— Manava Arun Naik (@Manavanaik) October 15, 2022
Marathi Actress Manava Naik Shocking Incident
Entertainment