इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तशी तर ती सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहे. पण अभिनयाची आवड काही तिला सोडवेना. जवळपास १८ वर्ष रंगभूमी गाजवत असताना तिला छोट्या पडद्यावर संधी मिळाल्यावर तिथेही तिने आपल्या अदाकारीने चार चाँद लावले. हे सगळं कौतुक सुरू आहे ते अभिनेत्री कृतिका तुळसकर हिचं. मराठी मनोरंजन सृष्टीत सध्या जे लग्नसराईचे दिवस आले आहेत, त्यात आता कृतिकाचाही समावेश होणार आहे. कृतिका आता बोहल्यावर चढणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकर याच्यासोबत तिची लग्नगाठ बांधली जाणार आहे.
मराठी रंगभूमीत सध्या लग्न सोहळे जोरात साजरे केले जात आहेत. नुकतेच अक्षया देवधर – हार्दिक जोशी, आशय कुलकर्णी – सानिया गोडबोले यांच्यानंतर बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेदेखील विवाहबंधनात अडकला आहे. त्यानंतर ‘रात्रीस खेळ चाले – ३’ या मालिकेतील अभिनेत्री कृतिका तुळसकर ही देखील लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत कृतिका लग्नगाठ बांधणार आहे. नुकताच त्यांचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. त्यांच्या लग्नाची तारीख काही अद्याप समजलेली नाही.
कोकणातील पार्श्वभूमीवर एका कुटुंबातील घडणाऱ्या घडामोडींमधून निर्माण होणारे भयावह वातावरण यातून ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका घराघरात पाहिली जाते. या मालिकेचे ३ रे पर्व सध्या सुरू आहे. या मालकेतील शेवंता हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. हे पात्र अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारत होती. मात्र तिने अचानक एक्झिट घेतल्याने त्याजागी कृतिका तुळसकर हिने ती भूमिका स्वीकारली. शेवंताच्या भूमिकेतून कृतिका तुळसकर घराघरात पोहचली.
गेली १८ वर्षे ती रंगभूमीवर कार्यरत असून, तिनं अनेक नाटके तसेच चित्रपटांत काम केलं आहे. ती कथ्थक विशारदही आहे. विशेष म्हणजे ती पेशाने मानसोपचारतज्ज्ञ आहे. तर विशाल देवरुखकरने ‘बॉईज’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यानंतर ‘बॉईज २’ आणि ‘बॉईज ३’ चेही दिग्दर्शन त्याचेच आहे. यासोबतच ‘गर्ल्स’ चित्रपटाचाही तोच दिग्दर्शक आहे.
Marathi Actress Krutika Tulaskar Wedding
Director Vishal Devrukhkar Entertainment Film Movie TV