इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते – अभिनेत्री त्यांच्या फटकळपणासाठी प्रसिद्ध आहेत. काही कलाकार जसे व्यवस्थेवर झोड उठवतात तसेच ते त्यांना ट्रोल करणाऱ्यांचा देखील समाचार घेतात. अभिनेत्री हेमांगी कवी ही त्यातीलच एक. नुकताच तिने तिच्या आजारपणाच्या पोस्टवर एकाने केलेल्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
हेमांगी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील अपडेट्स सोबतच ती समाजातील खटकणाऱ्या गोष्टींवरही तिच्या पोस्ट्स असतात. यामुळे अनेकदा तिला टीकाकारांना तोंड द्यावे लागते. असे असले तरी हेमांगी त्यांनाही सडेतोड उत्तरे देते. हेमांगीने नुकतीच एक पोस्ट शेअर करत शूटिंगदरम्यान तिच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं. तिच्या याच पोस्टवर एका नेटकऱ्याने केलेली कमेंट हेमांगीला पटली नाही. त्यामुळे तिने याला चोख प्रत्युत्तर दिले.
मालिकेच्या सेटवर दुखापत
‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेच्या सेटवर पायरी चढत असताना हेमांगीचा अंदाज चुकला आणि तिच्याच पायाच्या अंगठ्याचं नख तिला चांगलंच लागलं. तिने त्यावर प्राथमिक उपचार केले परंतु तरीही ती जखम ठसठसत होती. भरीस भर म्हणून दुसऱ्याच दिवशी तिच्या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग होता. हा प्रयोग कसा पार पडेल अशी सर्वांनाच काळजी होती. पण प्रयोगाच्या वेळी हेमांगी पूर्णपणे त्या भूमिकेत घुसली. आणि दुखावलेल्या पायासह अडीच तास तिने रंगमंचावर नाटक सादर केलं. नाटक करत असताना तिच्या पायाला लागलं आहे, तिला वेदना होत आहेत हे सर्व ती विसरून गेली होती, असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं.
काळजी घेण्याचे आवाहन
हेमांगीने ही पोस्ट शेअर करताच त्यावर ताबडतोब नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. तिच्या चाहत्यांसोबतच मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आणि तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला. पण एकाने या पोस्टवर “काहीपण टाकायचं आणि विषय द्यायचा,” अशी कमेंट करत तिच्यावर टीका केली. तर हेमांगीने “कृपया मला अनफॉलो करा. हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीही चांगलं राहील”, असा सल्ला दिला.
Marathi Actress Hemangi Kavi Injured Shoot